Posts

Showing posts from April, 2013

मुंब्रा दुर्घटनेतील कोणासाठी तरी...

आई ग, विचारू का तुला प्रश्न काही उत्तरं शोधतेय गेले कित्येक तास, पण त्रास होत असेल तर नकोच बोलूस, घुसमटताना दिसतोय मला तुझाही श्वास... कुठे गेलं आपलं घर चांदण्यांशी गप्पा मारणारं... कुठे गेलं खिडकीतलं रोपटं आभाळाला कवेत घेणारं... कुठे गेली गच्ची थेट स्वप्नांच्या राज्यात नेणारी... कुठे गेली माझी बाहुली, बोट धरून चालणारी... दप्तरही हरवलं नि पुस्तकंही फाटली... शाळा नको म्हटलं म्हणून बाप्पाने शिक्षा का ग दिली... सांग ना आई... बाबा कुठे गेला मला दिसतच नाही, आजीचीही हाक ऐकू येत नाही... आजोबांसोबत जाणार होतो आज फुलं वेचायला, उद्याच्या पूजेसाठी जास्वंद तोडायला... म्हणालेले मला आजोबा फिरून येतो आणि हाक मारतो तुला, आजोबा पण दिसत नाहीत, काही सांगितलेलं का तुला... सांग ना आई, नेमके कुठे आहोत आपण, कळत नाही काहीच एकटीच रडतेय गेले कित्येक क्षण... हवंय माझं तेच घर आभाळाच्या सावलीतलं, तुझ्या आणि बाबांच्या धमाल, मजेदार कुशीतलं... खरंच सांगते, पुन्हा मातीत खेळणार नाही... एकदाच फक्त एकदाच ऐक... मोकळा श्वास मला उसना आणून दे ना ग आई...