जन्मकथा
तीन पायांची शर्यत
आता इतक्या वर्षांनी ब्लॉग
लिहायचा प्रयत्न करणार आहे. किमान सुरू तरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी
थोडं काही.
लोकप्रभामध्ये आणि
लोकसत्ताच्या व्हिवामध्ये मृण्मयी नावाने लिहिलं. सगळ्यात आधी ते लेख त्या ब्लॉगवर
टाकायचा प्रयत्न असेल कारण ती माझी अडीच वर्षांच्या प्रवासातली अनमोल ठेव आहे.
अर्थात अनेक अनुभवही आहेत. मृण्मयी या नावाने लिहिताना ओळखींच्याकडून अनुभवलेला
कुत्सितपणाही आहे. पण त्या सगळ्यापेक्षा मोठं होतं माझं आर्टिकल झाल्यानंतर मलाच
वाटलेलं समाधान. ते आर्टिकल पब्लिश झाल्यानंतर मेलबॉक्समध्ये आलेले मेल्स. हे सारं
केवळ मला नॉस्टॅल्जिया म्हणून जपायचं नाही. ते जन्मभर शक्य झालं तर जोपासायचंय.
म्हणून...
मृण्मयी नावाने का
लिहिलं... या नावाबद्दल प्रचंड आकर्षण होतं. पहिल्यांदा चाणक्य मंडलच्या एका
निवासी शिबिरात वीणा देव, मधुरा डहाणूकर यांनी शितूचं वाचन केलं ते ऐकलं आणि मग
त्या मागोमाग एक संवेदनशीलता जागृत झाली. गोनिदांची काही पुस्तकं त्यापूर्वी वाचली
होती पण ते कादंबरीवाचन ऐकलं आणि मग शितू आणि मृण्मयी मुद्दाम मिळवून वाचल्या.
दोघींचा वेडेपणा खूप भावला. मृण्मयीचं झाडांमाडांवरचं प्रेम भावलं. तिची जगण्याची
उर्मी मिळवण्याची पद्धत भावली. दरम्यान व.पुं.च्या तू भ्रमत आहासि वाया (बहुधा)मध्ये
एक वाक्य वाचलं. इतर संदर्भ आठवत नाही पण ते वाक्य आठवतंय. तू मातीतून जन्मला आहेस
आणि मातीतच परत मिसळणार आहेस. ती कादंबरी आणि वपुंचं ते वाक्य डोक्यात पक्क बसलं.
आणि मग मृण्मयी कुठेतरी आतल्या आत जगायला लागली अनुजामध्ये. कॉलम सुरू करताना समोर
अनेक नावं आली. अनेकांनी अनेक नावं सुचवली. पण त्यातलं जवळचं फक्त आणि फक्त
मृण्मयीच वाटलं. नातं कदाचित आधीच निर्माण झालं होतं.
तिचा जन्म कदाचित आईने
लहानपणी गोष्टींची पुस्तकं वाचून दाखवली तेव्हा झाला असेल. तिचा जन्म कदाचित
बाबांनी रचून सांगितलेल्या गोष्टींमध्ये झाला असेल. तिचा जन्म कदाचित मोठ्या
बहिणीच्या कविता लिहिण्यातून आणि त्या कवितांच्या होणाऱ्या कौतुकातून झाला असेल
किंवा तिचा जन्म बहिणीच्या कवितांच्या कौतुकाबद्दल जेलसी निर्माण होऊन पहिल्यांदा
र ला र आणि ट ला ट जुळवून नि.र. सहस्रबुद्धे सर गेले तेव्हा लिहिलेल्या पहिल्या
कवितेतून झाला असेल. कदाचित इजाजतमधली माया पाहताना तिचा जन्म झाला असेल. त्या
मायामध्ये स्वतःला शोधताना तिचा जन्म झाला असेल. माहीत नाही. कुठलीच आठवण विसकटून
तिच्या जन्मापर्यंत पोहोचता येत नाही. पण तिचं जगणं मात्र हळूहळू कळत गेलं... त्या
जगण्याला अनुजाच्या बाहेर यायला कधी मिळालं नव्हतं. प्रयत्न केलाही असेल, माहीत
नाही. ते जगणं बाहेर आलं माझ्या एका मैत्रिणीमुळे. तिच्या आयुष्यातल्या एका घटनेमुळे.
त्या घटनेनंतरच्या माझ्या निर्णयामुळे आणि त्याला उघड अस्तित्व प्राप्त झालं टोकेकर
सरांमुळे. त्यांच्याकडे एक विषय जाता-जाता, गप्पा मारता-मारता सांगितला आणि
त्यांनी सांगितलं लिही या विषयावर. पहिलंच आर्टिकल होतं ते मृण्मयीच्या साच्यातलं.
तद्दन बेकार. लिहायला खूप होतं पण शब्दच सापडत नव्हते. डोक्यातला बॉटल नेक. पण तरी
सरांनी वाचलं आणि पुन्हा लिहायला सांगितलं. आणि मग मृण्मयी उलगडत गेली.
ती उलगडताना आजूबाजूच्या
अनेक घटना अधिक पारदर्शी होऊन समोर आल्या. प्रत्येक वेळी नेहमीच्या जगण्यापलीकडचे
पदर पाहायला, एक श्वास घ्यायला थोडी फुरसत मिळाली. मृण्मयी म्हणून आर्टिकल लिहून
झालं की ते हक्काने ऐकवायला माझा एक श्रोता होता. त्या मित्राला वाट्टेल त्या
वाजता आर्टिकल ऐक म्हणून त्रास दिलाय. कधी त्याला विचार पटायचे, कधी नाही, मग
चर्चा, वाद. कधी तो काहीच बोलायचा नाही. पण पहिलं शेअरिंग खूप आवश्यक असायचं.
प्रेमाच्या संदर्भातली आर्टिकल्स ऐकवायला एक मैत्रीणही होती. तिने स्पष्ट सांगितलं
होतं की प्रेम या विषयावर असेल तरच ऐकव. लिहिलेलं ऐकवताना अधिक मजा यायची.
स्वतःचंच आश्चर्य वाटायचं की हे मीच लिहिलंय... पण लिहिताना अनुजामधली मृण्मयी जगत
असायची अनुजाला समृद्ध करत. अनुजा कधी पाहणार नाही अशा घटनांकडेही पाहायला मला या
टोपणनावाने शिकवलं. मी कधी विचारही केला नसता की कोणाची परवानगी न घेता मी फोटो
काढते तेव्हा इतरांना काय वाटत असेल, पण हा विचार मृण्मयी जगताना माझ्या मनात आला.
स्वतःचा दांभिकपणाही समोर आला. एरवी भिकारी कधी ट्रेनमध्ये बाजूने गेले की कपाळाला
आठ्या पडणाऱ्या मला, प्लॅटफॉर्मवर बसलेले भिकारी मात्र बिचारे कसे वाटू शकतात, असा
प्रश्न मला मृण्मयीने विचारला आणि उत्तरही तिनेच दिलं- जवळचं आणि दूरचं हा तो फरक
असतो... मृण्मयी माझ्या जगू लागली, ती माझ्यासोबत जगू लागली. आमची तीन पायांची
शर्यत सुरू झाली. प्रत्येक विचाराला अनुजा आणि मृण्मयी अशा बाजू दिसू लागल्या.
थोडी सरमिसळ, थोडी दोघींची भांडणं, वाद... पण तरीही दोघीही एकमेकींना घट्ट
बांधल्या गेलेल्या. तोल ढळू न देता चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या. मुक्त जगण्याच्या
प्रयत्नात जमिनीशी बांधल्या गेलेल्या अस्तित्वाची जाणीव असणाऱ्या.
गेल्या काही महिन्यांमध्ये
काहीच लिहिलं नव्हतं. कालच्या स्फोटानंतर दोघी एकमेकींसमोर आल्या आणि भांडल्या.
माझ्या घरचे सुरक्षित आहेत म्हणून एकीककडे निःश्वास टाकलेल्या मला जे गेले
त्यांच्या मागे उरलेल्यांचं काय झालं असेल, काय होईल हा प्रश्न जाचत होता. तो प्रश्न
काही दिवसांनी कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसेलही. पण मला या निमित्ताने पुन्हा एकदा
मृण्मयीच्या अस्तित्वाची जाणीव झाली.
ती माझ्याशिवाय जगू शकत
नाही आणि मी तिच्याशिवाय. बांधल्या गेलो आहोत केव्हाच, आधी फक्त मला जाणवत होतं
आता ते जगाला दिसलं एवढंच.
Comments
Post a Comment