लोकसत्ता- व्हिवा- वळणवाटातल्या...

स्वप्नातील पदर धुक्याचा : वळणवाटातल्या झाडीत हिरवे छंद… Bookmark and Share Print E-mail
स्वप्नातील पदर धुक्याचा
शुक्रवार , १८ फेब्रुवारी २०११
mrunmayee.a@gmail.com
मुंबई मागे पडली आणि त्या क्षणी तिला ऐकू आल्या नव्या जगाच्या हाका. मुंबईचं बहिरेपण गळून पडलं. तिला गाव आतुरतेनं बोलवत होतं..
गाव नसलेल्या घरातली ती.. गाव कसं असतं, गाव म्हणजे काय, गावातली माणसं म्हणे खूप मधाळ असातात! सारं फक्त गोष्टीत वाचलेलं. त्या गावच्या नदीच्या पाण्यात ती कधीच पाय सोडून बसली नव्हती, त्या पाण्यामध्ये डोकावणारी झाडं तिने कधीच पाहिली नव्हती. मार्केटमध्ये टोपल्यांमध्ये ठेवलेल्या गजऱ्यांशिवाय तिने अबोली, मोगरा अशी फुलं पाहिली नव्हती. मनमुक्त फुलणारी फुलं कशी असतात? तिच्या आजूबाजूला होती फक्त कुंडीतली झाडं. खुरटलेली. कधी बुरसटलेली. सकाळी उमललेल्या गुलाबाच्या पाकळ्या संध्याकाळी कुंडीत गळून पडलेल्या तिला दिसायच्या.. तिच्या गॅलरीच्या रेलिंगवर नारळाची झावळी विश्रांती घ्यायची, पण तिला त्याचा राग यायचा. त्या फांदीला ढकलून देऊन जागं करावंसं तिला वाटायचं. त्या झावळीवरून घरात शिरणारे मुंगळे पाहिले की तिला किळस वाटायची. पांढऱ्या स्वच्छ लादीवर काळे डाग..
पण एक दिवस हे बदललं.
ती आणि तिची मैत्रीण खुडखुडणाऱ्या एसटीत बसल्या आणि तिच्या मैत्रिणीच्या गावाला रवाना झाल्या. मुंबई मागे पडली आणि त्या क्षणी तिला ऐकू आल्या नव्या जगाच्या हाका. मुंबईचं बहिरेपण गळून पडलं. तिला गाव आतुरतेने बोलावत असल्याचं लक्षात आलं. त्या गावाभोवताली पहारा देणारे कडे कित्ती र्वष टाचा उंच करून तिला बघत होते, बोलावत होते. आता तर टाचा उंचावून त्यांचे पायही दुखायला लागले होते. पण ते खाली बसण्याआधी ती पोहोचली होती.. मुंबईतल्या बिल्िंडग्स इतक्या उंच होत्या की तिला ते कडे कधी दिसलेच नव्हते.. कच्च्या-पक्क्या रस्त्यांवरून माती उडवत एसटी धावायला लागली आणि मग धावत जाऊन तिची वाट बघत असलेल्या त्या कडय़ांना तिला गच्च मिठी मारावीशी वाटली. कधी गच्चीवर जाऊन त्या कडय़ांना साधं हायसुद्धा न म्हटल्याबद्दल तिला त्यांना सॉरी म्हणावंसं वाटलं. तिच्या आयुष्यातही गाव आलं होतं. गावपोरक्या तिला सगळ्याच गावांनी दत्तक घेतलं होतं.
ती गावात पोहोचली. त्या कशाही, वेडय़ावाकडय़ा पसरलेल्या त्या मैत्रिणीच्या घरात ती तशीच वेडीवाकडी धावत सुटली. घरभर धावून दमली आणि मग एका जागी बसली. तिथे कौलांमध्ये बसवलेल्या काचेमधून किरणं थेट तिला भेटायला आली. तिथे बसून ती त्या उन्हाशी खेळली. ते ऊन दमलं, झोपण्यासाठी घरी गेलं पण ती नाही दमली. उन्हाने निरोप घेतल्यावर अंगणातल्या मऊ-मऊ मातीत पाय खुपसून ती बसली. त्या मातीतले मुंगळे पाहून तिला अजिबात किळस वाटली नाही.. पण निसर्ग अजूनही तिला कळला नव्हता. त्या मुंगळ्यांच्या लगबगीतली मजा तिला पहिल्यांदाच कळली. एक मुंगळा पानाच्या टोकाला धरून त्या वेलीवर चढला. त्याला पाहता-पाहता पोपटी, हिरवा, तजेलदार रंग तिला समजला. हिरवा रंग मनाला भावतो हेही तिला पहिल्यांदाच कळलं. मोगरा, गुलाब, झेंडू, अबोली, अगदी तुळशीच्या काळ्या-सावळ्या मंजिऱ्याही तिला उत्फुल्ल भासल्या. त्यांच्या वाऱ्याबरोबरच्या हसून-खिदळून मारलेल्या गप्पा तिला ऐकू आल्या. त्या घरातल्या एका सुरकुतलेल्या हाताने त्या साऱ्या झाडांची प्रेमाने जाऊन केलेली विचारपूस तिला आवडली. मग तिनेही जाऊन त्या पानांवरून, वेलींवरून, झाडाच्या खरखरीत खोडावरून हळुवार हात फिरवला. मजा आली.. त्या फुलांनाही गोंजारलं. त्या फुलांचे रंग बोटांवर उतरलेत का हे तिने पुन: पुन्हा तपासून पाहिलं आणि अवचित तिला ते रंग दिसले. तिची बोटं हिरवी झाली. तिचे तळहात अबोली झाले.. तिला निसर्ग कळला.
ती अशी मृण्मयी झाल्यावर अवघा निसर्ग तिच्यासोबत हसू लागला. गाऊ लागला. ते रंग तिच्या हातावर कायमचे चिकटून बसले.
दोन दिवसांत तिची एसटी परतीच्या वाटेला लागली. परतताना ती एकटी नव्हती. सारी पानं-फुलं, ओहोळ, नदी, आभाळाला पकडायला निघालेले कडे आणि तिच्या हातावरचे सारे रंग तिच्यासोबत होते. आता हे सारं तिच्या प्रतीक्षेत तिला हाका मारणार नव्हतं. या साऱ्या गोष्टी गप्पा मारत तिच्यासोबत मुंबईत आल्या.
तिला पुन्हा एक हाक ऐकू आली.. ही हाक होती मुंबईतल्या निसर्गाची. त्या निसर्गाने स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची..
आता तिच्या गाव नसलेल्या घरात, उदास वाटणाऱ्या काळसर हिरव्या रंगात तिचं तिच्यासोबत आलेलं गाव वसलंय. तिच्या गॅलरीतले मुंगळे तिच्या बोटांवरून निर्धास्तपणे, राजेशाही थाटामध्ये चालतात. कधी दुरून येणारा रातराणीचा सुगंध तिला जवळ बोलावून घेतो तर कधी डांबरी रस्त्यावर सकाळच्या उन्हात चटचटणारं इवलं प्राजक्ताचं फूल तिला उचलून घ्यायची विनंती करतं. तिच्या घरात पहुडलेली नारळाची झावळी एखाद्या धुकटलेल्या पहाटे तिच्या कुंडीच्या काठावर इवलासा मोती सांडते. तिच्या कम्पाऊण्डमधली झाडं ती दिसली की तिच्याकडे बघून छानसं हसतात. गजबजलेल्या रस्त्यावरून जातानाही, रस्त्याच्या कोपऱ्याला, जाळ्यांआड दडलेलं बहाव्याचं झाड आपली झुंबरं लखलखवत तिचं लक्ष वेधून घेतं..
मुंबईचा निसर्ग असा तिच्या डोळ्यातलं आपलं रूपडं बदलतोय. म्हणूनच बागेतल्या कोपऱ्यात गुमसूम होऊन बसलेली झाडं आता वाऱ्यावर डोलताना तिला दिसतायत. गुलाबाची फुलं मावळताना तिच्या वहीत ठेवायला तिला पाकळ्या देतायत. ऑफिसटाइम बहरताना तिला गुड मॉर्निग म्हणतोय. तिच्या आजूबाजूच्याच नाही तर कळकटलेल्या मुंबईत हिरवा रंग काळपटपणा टाकून देऊन तजेलदार होताना तिला दिसतोय. या झाडांशी, इथल्या निसर्गाशी तिची आता छान मैत्री झालीए. त्यांच्यामध्येसुद्धा गावातल्या झाडांइतकाच आपलेपणा आहे हे तिला कळलंय! परत येताना तिच्या कानावर आलेली हाक तिला खऱ्या अर्थाने ऐकू आलीए आणि ही नवी मैत्री तिला दत्तक घेतलेल्या त्या सगळ्या गावांसारखीच तिच्या भिंतीवर नवी ओळख पटवत अभिमानाने मिरवत्येय!

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ