रंगीबेरंगी दिवसांच्या छटा...



रंगीबेरंगी दिवसांच्या छटा...

आज अभिज्ञचा अॅन्युअल डे इव्हेण्ट होता. त्याचा परफॉर्मन्स पाहताना स्वतःच्या वार्षिकोत्सवाची आठवण नसती झाली तरच नवल होतं. मन पार माझ्या ज्युनिअर केजी, सिनिअर केजीमध्ये पोहोचलं.
त्याचा परफॉर्मन्स आज लाइव्ह यु-ट्युबवर दिसत होता. त्याच्या आईने, आजीने दोघींनी लाइव्ह नेटवर पाहिला. ही छोटी-छोटी पिलं एवढी गोड-गोड दिसत होती. त्यांना शामक दावर डान्सिंग स्कूलच्या मदतीने ट्रेन करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. प्रत्येक क्लासमधल्या प्रत्येकाला स्टेजवर यायची संधी देण्यात आली होती. ग्रुप डान्समध्ये कोण स्वतःचं किती स्किल्स दाखवतंय याचा विचार करण्यात आला नव्हता. कोण टिचरचं पेट आहे, कोण नाही याने काही फरक पडत नव्हता. टिचरला कोण जास्त टॅलेन्टेड वाटतंय आणि कोण नाही याने फरक पडला नव्हता. सगळे सारखे. अगदी एक सारखे.
पण माझ्या शाळेत, माझ्या लहानपणी खरंच असं नव्हतं. का नव्हतं मला माहीत नाही. नर्सरी, ज्युनिअर केजीचा वार्षिकोत्सव खरंच आठवत नाही पण सिनिअर केजीचा आठवतोय. आमच्या शाळेच्या गच्चीवर झाला होता. शाळेच्या गच्चीवर जायचं हा सगळ्यात मोठा आनंद होता. एक नाटक होतं आणि त्यात माझे दोन वर्गमित्र उंदीर झाले होते. पहिलीमध्ये एक डान्स होता. त्यातही माझ्या वर्गातल्या दोन मुली होत्या. बाकी अख्खा वर्ग प्रेक्षक. त्या डान्समध्ये मला अगदी मनापासून भाग घ्यायचा होता. पण बाईंनी निवडलंय त्या दोघींना एवढीच भावना तेव्हा लक्षात राहिली.
दुसरीमध्ये शाळा बदलली. त्याच वर्षी एका नाटकात भाग घ्यायला मिळाला. स्टेजवर उभं राहायचा अनुभव नव्हता. पण बाईंनी प्रचंड मेहनत घेतली आणि सगळे संवाद, अख्खं नाटक पाठ झालं. पण स्टेजवर उभं राहताना प्रेक्षकांकडे बघायचं हे वाक्य डोक्यात इतकं पक्कं बसलं होतं की समोरची मुलगी संवाद म्हणत असतानाही, मी मात्र प्रेक्षकांकडेच बघत होते. भीती वाटत होती की नाही आठवत नाही, पण टेन्शन मात्र होतं. कारण बोलत असताना हाताची नखं वाजवत असल्याचं आठवतंय. त्यानंतर कोणीतरी मुद्दाम न घेतल्याने थांबायची वेळ आली नाही. नाटकाची शिबिरं, नाचाची शिबिरं असा प्रवास सुरू झाला. आठवी, नववी तर खूपच धमाल होती. क्रीडा-महोत्सव, वार्षिकोत्सवापासून अगदी नाट्यवाचन स्पर्धेपर्यंतची संधी मिळाली. शाळेच्या काळात कदाचित या सगळ्या अचिव्हमेण्टस् होत्या. आज ही सगळी धमाल आहे... मोठं झाल्याचं लक्षण. एकदा मोठ्या बहिणीशी भांडल्यानंतर (तिच्या होमी भाभा, प्रज्ञा, बीटीएस, एमटीएस या सगळ्या अचिव्हमेण्टबद्दल ऐकलेल्या प्रामाणिक कौतुकानंतर) डायरीत लिहिलं होतं- तिने केलेलं का नाटकात काम, तिला घेतलेलं का डान्समध्ये, तिने कधी नाट्यवाचन केलं होतं का आणि असं तसं काही... (माज दाखवता आला नव्हता उघडपणे म्हणून डायरीत).
आज हे सगळं आठवायचं कारण एवढंच की, ज्यांना खूप धडपड करूनही हिरमुसलेपण वाट्याला येत असेल त्यांच्या मनावर त्या वयात खरंच किती आघात होत असेल. मला मिळालं या भावनेच्या भरात मला त्या वेळी कधीच कळलं नव्हतं की ज्यांना मिळालं नसेल त्यांचं काय... आज वाटतंय. आज कळतंय. आज यातला कुठलाच माज उरलेला नाही. थोडं लकी वाटतंय पण अभिमान करण्यासारखं यात काहीच नव्हतं. बाईंनी डान्समध्ये नाही घेतलं, नाटकात निवड नाही झाली असं कोणीतरी घरी जाऊन सांगताना कदाचित रडलंसुद्धा असेल. मला कधी कळलंही नाही. सगळं मिळायलाच हवं असं नाही पण किमान संधी स्वतःला सिद्ध करण्याची. त्यांना तीही नाकारली गेली असेल. आज पाहिलेल्या त्या रंगीत जगातल्या मुलांना पाहताना वाटलं की ती मुलं चुकत आहेत, विसरत आहेत याने खरंच काही फरक पडला का... किमान आठ-नऊ वर्षांपर्यंत तरी त्या सगळ्यांनाच असं जपणं शक्य झालं तर किती छान होईल. येतच नाही, कधी करताच येणार नाही असा आत्मविश्वास उगाच हरवण्याचं वय ते नक्कीच नाही. तेव्हा, त्या वयाकडून उलट सगळं येतं, सगळं येईल, त्यात काय कठीण, मी शिकवू का असं ऐकायला जास्त मजा येते. त्यात परफेक्शन किती असतं हा मुद्दाच विचारात घ्यावासा वाटत नाही.
शाळेतल्या वयात हे नाही कळू शकलं. स्वतःकडून त्या वयात ही अपेक्षा खरंच योग्य आहे का, हाही मुद्दा आहेच. त्याचा विचार पुन्हा कधीतरी वेळ मिळेल तेव्हा. पण आज हे कळलंय तर यापुढे त्याची योग्य अमलबजावणी करता आली तर आजचा दिवस सत्कारणी नक्की लागेल.
माझ्या त्या रंगीत जगातल्या छटांना सोनेरी किनार लाभेल... ती मिळावी म्हणून हे सारं नक्की नाही. पण लाभली तर आनंद नक्कीच होईल.

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ