लोकसत्ता- व्हिवा- सुरवंटाचे झाले पाखरू

स्वप्नातील पदर धुक्याचा : सुरवंटाचे झाले पाखरू... Bookmark and Share Print E-mail
स्वप्नातील पदर धुक्याचा
शुक्रवार , ४ मार्च २०११
mrunmayee.a@gmail.com
स्वत:चं मुलगी असणं त्या इवल्याशा बोटांनी घट्ट पकडलेल्या हातांमध्ये सामावून आलं होतं. स्वत:चं स्त्रीत्व इतकं हळुवार, नाजूक तरी आधार देणारं, गोजिरवाणं असं पहिल्यांदाच दिसलं. तोच क्षण होता सुरवंटाचं पाखरू होण्याचा.. आता कोणत्याच भरारीची भीती नव्हती, कोणत्याच भरारीची जबरदस्ती केली जातेय असं वाटत नव्हतं. मुक्त मनाने, आनंदाने, विचारांच्या कोणत्याही बेडय़ांशिवाय घेतलेली ती झेप होती.. स्वत:चं स्त्रीत्व सन्मानाने स्वीकारण्याच्या या प्रवासाबद्दल सांगत्येय मृण्मयी..
लहानपण.. अगदी लहानपण. पहिली, दुसरीतलं. आईची साडी नेसून, तिच्या मोठय़ा-मोठय़ा बांगडय़ा घालून मिरवायची हौस असलेलं. तीन-साडेतीन फुटांच्या इवल्याशा उंचीला ती साडी नेसवणं म्हणजे मोठं कसब असायचं. त्या साडीच्या निऱ्या खोचल्या की पोटापेक्षाही त्या खोचलेल्या निऱ्यांचा आकार मोठा व्हायचा नि साडीचा बोंगा व्हायचा. तो किती वेळा पायात यायचा, त्यात किती वेळा अडकून घालीन लोटांगण व्हायचं तरीही हौस फिटायची नाही. प्रत्येक वेळी साडी नेसण्याचा उत्साह अबाधित असायचा. स्वत:चं मुलगी असणं असं कुठेतरी मनात रुजत होतं पण कळत नव्हतं. फ्रॉक, जीन्स, टी-शर्टस्, शॉर्टस् यामध्ये दिवाळी, गुढीपाडवा अशा सणांना कधीतरी साडी नेसून बििल्डगभर मिरवायचं, कौतुक करून घ्यायचं एवढंच समीकरण डोक्यात होतं. पण तरी कधी मुलगी-मुलगा यामध्ये फरक कळला नव्हता. शाळेत मस्ती केल्यावर मुलांना जास्त कडक शिक्षा व्हायची, मुलींना काही वेळा सूट मिळून जायची हे कळलं होतं पण त्याचं कारण आपण मुली आहोत हे आहे हे कधीच अधोरेखित झालं नव्हतं. उलट मुलांना शिक्षा झाली की खूप मज्जा वाटायची. चिडवायला कारण मिळायचं. अशी स्पेशल ट्रिटमेण्ट मिळायचं खरं कारण शाळेत कधीच नाही कळलं. त्यासाठी शाळेचा उंबरठा ओलांडून बाहेर पडावं लागलं.
सातवीमध्ये गेल्यावर केवळ मुलींसाठी आयोजित करण्यात आलेली वेगळी लेक्चर्स, फक्त मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली वेगळी लेक्चर्स, मग त्यावरून वर्गात सुरू झालेली कुजबूज, मुलींना हॉलमध्ये एकत्र जमायला सांगितलंय अशी सूचना आल्यावर मुलांमध्ये उमटणारी हास्याची लकेर, डोळ्यांनी सुरू झालेल्या खाणाखुणा सगळं स्पष्टपणे जाणवायचं. ही लेक्चर्स कशाला हवी असतात, हा फालतूपणा कशाला करायचा असे विचारही डोक्यात यायचे. तुम्ही मुली एवढय़ा आजारी कशा पडता, किती दांडय़ा मारता असे कधीतरी वर्गमित्रांचे ऐकलेले टोमणे ऐकून आता याला उत्तर काय द्यायचं असं वाटायचं. स्वतलाच या मोठय़ा होण्याचा अर्थ कळत नव्हता तर इतरांना कसं काय समजावून देता येणार होतं? या सगळ्यात सर्वात जास्त त्रास झाला तो ऋतुमती झाल्यावर. सगळ्याचा भयंकर राग-राग आलेला. जग केवढं तरी बदलून गेलेलं. मोठं होणं हे असं असतं? नाही झालं मोठं तर काय होईल? हे सारे प्रश्न विचारायला आई हा एकमेव पर्याय होता. तिला हे आणि इतरही अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं. अगदी आई प्लीज मला मुलगा कर ना असंही सांगून झालं. काहीतरी ऑपरेशन करून मुलगा बनवून टाक आता अशा केवढय़ा विनवण्या केल्या असतील त्या वेळी.
त्याच दरम्यान, रस्त्यावरून जाताना कधी टवाळ मुलांच्या शिटय़ा ऐकून प्रत्येकाला जाऊन एकेक थोबाडीत द्यावी अशीही खूप इच्छा व्हायची. कोणीतरी शाळेतच येऊन सांगायचं की त्याला ती खूप आवडते तेव्हाही असाच राग यायचा. आवडणं, प्रेम अशा शब्दांचे अर्थ कुठे कळत होते. सो चीप.. असं काहीसं वाटायचं. कामधंदा नाही का मुलांना असा साजूक तुपातल्या फोडणीसारखा राग तेवढय़ाच नाजूक-साजूकपणे तडतडायचा. पण कोणाचीही जाऊन कॉलर-बिलर धरून जाब विचारण्याची िहमत आली नव्हती. आजीचं सांगणं, मुलीच्या जातीने जपून वागावं, मधूनच आजूबाजूला आजी नसतानाही ऐकू यायचं. ही मुलीची जात काय असते हे हळूहळू कळत होतं.. प्रगल्भ होण्याच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल कदाचित..
शाळेची र्वष अशी मुली हुशार की मुलं हुशार हे ठरवण्यात संपून गेली. मुलांपेक्षा मुली जास्त हुशार असतात, मेहनती असतात, नीटनेटक्या असतात, निरागस असतात, जास्त सिन्सिअर असतात, त्या सगळ्या परिस्थितीला व्यवस्थित तोंड देऊ शकतात, त्या उत्तम मॅनेजर असतात, दिलेली प्रत्येक जबाबदारी नीट पार पाडतात, कोणालाही सहज लळा लावतात अशी कौतुकं ऐकण्यात, करून घेण्यात गेली. मुलगी असण्याबद्दल स्वतचा एकीकडे आलेला राग, दुसरीकडे मुली इतक्या चांगल्या असतात म्हणून कुठेतरी स्वतबद्दल छान वाटणं अशा दोलायमान परिस्थितीत कॉलेजच्या उंबरठय़ावर पाय ठेवला. शाळेतल्या ग्रुपमधल्या मुलांपेक्षा विश्व थोडंसं व्यापक झालं अगदी सहज. कोणीतरी खास दिलेला भाव हवासा वाटू लागला. पण हेसुद्धा कळलं नव्हतं. सारं नकळत. मुलगी असणं थोडंसं गोड झालं तेव्हा. छान-छान दिसावंसं वाटू लागलं. कोणीतरी वळून आपल्याकडे बघतंय याबद्दल उगाच अभिमानही वाटू लागला. मुलगीपण तेव्हा असं थोडं आनंदाने रुजू लागलेलं. तरी मुलांसारखं भन्नाट भटकायला, रात्रभर बाहेर राहायला, कट्टय़ावर पाहिजे तेव्हा पडीक राहायला मिळत नाही हे बोचायचंही. मुलींसाठी कोस्रेसमध्ये राखीव जागा, त्यावरून ग्रुपमध्ये झालेली कडाक्याची भांडणं, शेवटी तुम्हाला आधाराची गरज पडतेच असं म्हटल्यावर इगोने काढलेला फणा, स्त्री अबला, स्त्रियांसाठी रिझव्‍‌र्हेशन्स, गर्दीतले धक्के, आजूबाजूला चालणारं विमेन्स डे सेलिब्रेशन, अशा सेलिब्रेशनची गरज काय अशा नकारात्मक छटा त्या मोठय़ा होण्याला होत्या. त्या कोणालाही दूर करता येत नव्हत्या. मुलांच्या गर्लफ्रेंडकडून असलेल्या अपेक्षा, बायकोकडून असलेल्या अपेक्षा, आईकडून असलेल्या अपेक्षा त्यातली गुंतागुंत वाढवत होत्या. स्वत: मुलं किती अशा अपेक्षा पूर्ण करतात की आजूबाजूच्या मुलींकडून, स्त्रियांकडून अगदी आईकडूनही एवढय़ा अपेक्षा करतात असं वाटायचं. आजही वाटतं.. पशांच्या परिभाषेतली त्यांची बोलणी ऐकून ही मानसिकता कधी बदलणारच नाही का, त्यांना कधी माणूस म्हणून जगताच येणार नाही का असं वाटायचं. म्हणून स्वतचं मुलगीपण स्वतकडे जपताना जगासमोर एक चांगला माणूस म्हणून उभं राहण्याची धडपड सुरू झाली. समोरच्यानेही आपल्याला मुलगी म्हणून वागवण्यापेक्षा माणूस म्हणून वागवावं असा आटापिटा सुरू झाला. त्याच दरम्यान एका मत्रिणीने मुलगी असणं किती छान असतं हे उलगडून सांगितलं. कोणाला तरी नव्या जिवाला जन्म द्यायची क्षमता, मुलांना वाढवण्याची कला, कोणाचा तरी आधार बनणं, कोणीतरी आपल्यावर अवलंबून असणं किती सुंदर असतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न व्यर्थ ठरला. मुलींना पालक अशी मानसिकता घडवतच वाढवतात याची खात्री पटली. राग हा घटक वितळत नव्हता. उलट तो जास्तीत जास्त तापत होता.
दरम्यान, सगळ्यात लाडकी बहीण सारं सोडून लग्न करून सासरी गेली. तेव्हा तर किती काय काय वाटलेलं. ते स्वीकारावंच लागलं. पर्यायच सापडत नव्हता. तिला बच्चू होतानाचा काळही असाच त्रासदायक, स्वतच्या मुलगी असण्यावर संतापण्याचा होता. तिच्या मुलाच्या जन्मानंतरही यामध्ये फार फरक पडला नाही. त्या बच्चूला हातात घेताना लाडक्या बहिणीला झालेला त्रास विसरता येत नव्हता. या फंदात कधीच पडणार नाही, कोणाला जन्म देण्यापेक्षा अनाथ मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. बच्चू मोठं होत होतं तसा त्याच्या निरागसतेमध्ये बहिणीला झालेला त्रास हरवत गेला. पण तरी स्वतचं स्त्रीत्व मान्य करता येत नव्हतं. याच काळात एका मत्रिणीने प्रेग्नंट असल्याची बातमी दिली आणि तिला मुलगीच व्हावी असं प्रकर्षांने वाटलं. का, कसं वाटलं याची उत्तरं आजही ठाऊक नाहीत. पण आतला आवाज काहीतरी सांगत होता. ते अर्धवट ऐकू येत होतं. स्पष्ट काहीच कळत नव्हतं.
एक दिवस तिचा एसएमएस आला. तिला मुलगी झाली.. ज्यावेळी तिचा तो एसएमएस आला त्यावेळी जगातला सगळ्यात मोठा आनंद मलाच मिळाला आहे असं वाटलं. गेले चार-पाच महिने आत कोंदटलेला आवाज अचानक नाजूकपणे गुणगुणू लागला. तिच्या चिमणीला हातात घेतल्यावर तर मुलगी असण्याबद्दलचा सारा कडवटपणा कुठेतरी दूर निघून गेला. तो क्षण इतका छान होता. स्वतचं मुलगी असणं त्या इवल्याशा बोटांनी घट्ट पकडलेल्या हातांमध्ये सामावून आलं होतं. स्वतचं स्त्रीत्व इतकं हळुवार, नाजूक तरी आधार देणारं, गोजिरवाणं असं पहिल्यांदाच दिसलं.
तोच क्षण होता सुरवंटाचं पाखरू होण्याचा.. स्वतचं स्त्री असणं सन्मानाने स्वीकारण्याचा. कारण आता कोणत्याच भरारीची भीती नव्हती, कोणत्याच भरारीची जबरदस्ती केली जातेय असं वाटत नव्हतं. मुक्त मनाने, आनंदाने, विचारांच्या कोणत्याही बेडय़ांशिवाय घेतलेली ती झेप होती...

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ