Lokprabha clm- spandan 1

 
६ ऑगस्ट २०१०
स्पंदन
मृण्मयी
तुझं असं काही विचित्र रूप दिसलं त्या फ्रेंडशिप डेला ज्याबद्दल कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मी आणि मग माझा हात आपसूकच उठला तुझ्या थोबाडीत द्यायला. त्यानंतर पुन्हा कधी तुझा चेहराही आयुष्यात आठवणार नाही असं ठरवलं. त्या चार वर्षांमध्ये खूप छान मित्र बनलेलो आपण, पण तुझं असं विकृत रूप कधी दिसलं नव्हतं.
‘नाही आठवणार म्हटलं की,
जरा जास्तच आठवतं
जुनं-पानं सारं डोळ्यांसमोर नाचतं..’
कुठच्या तरी चिटोऱ्यावरच्या तुझ्या या काही ओळी. धड चारोळी नाही, धड हायकू नाही. तू मला ऐकवलेलं तुझं पहिलं एक्स्प्रेशन. आज अचानक नीट आठवलं. काही दिवसांपूर्वी आठवायचा प्रयत्न केला होता पण पूर्ण नव्हतं आठवलं. काही शब्द निसटलेले. मला नको असलेलं सारं पुसून टाकायचा अतोनात प्रयत्न केला मी म्हणून ते शब्दही लपले असतील कदाचित.
आज आलेत परत..
तू म्हणायचास तसं, जायच्या असतील तर जातील त्या आठवणी, राहायच्या असतील तर राहतील.. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी आठवणींवर हुकूमत नाही गाजवू शकत. ते शब्दही असेच परत आलेत. माझ्या कुठल्याच इच्छेला न जुमानता. तो फ्रेंडशिप डे ते या वेळचा फ्रेंडशिप डे.. खूप स्थित्यंतरं घडलीत. थोडीशी मॅच्युरिटी आली. जगण्याला, विचारांना वेगळी डायमेन्शन्स मिळालीत, म्हणूनही असतील कदाचित ते शब्द परत आले..
तो फ्रेंडशिप डे आत्तापर्यंतच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट्ट फ्रेंडशिप डे होता. फ्रेंडशिप डेला नवीन मैत्री करायची की सगळं विस्कटून, उधळून देऊन दोन छान मित्रांनी मागे वळून न पाहता निघून जायचं. असं कधीच नको होतं व्हायला पण तरीही तसंच घडलं.. नि आता आशा आहे कॉलेजच्या पहिल्या फ्रेंडशिप डेसारखा फ्रेंडशिप डे परत एकदा अनुभवायची..

तुझं असं काही विचित्र रूप दिसलं त्या फ्रेंडशिप डेला ज्याबद्दल कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मी आणि मग माझा हात आपसूकच उठला तुझ्या थोबाडीत द्यायला. त्यानंतर पुन्हा कधी तुझा चेहराही आयुष्यात आठवणार नाही असं ठरवलं. त्या चार वर्षांमध्ये खूप छान मित्र बनलेलो आपण, पण तुझं असं विकृत रूप कधी दिसलं नव्हतं. खरं तर, शेवटचा फ्रेंडशिप डे कायमचा लक्षात राहील असं आगळंवेगळं काही करायचं आपण सगळ्यांनीच ठरवलेलं नि दुर्दैवाने, अनपेक्षित असं खरंच काही तरी आगळंवेगळं घडलं त्या दिवशी. मग चार र्वष ज्या मैत्रीचा अभिमान बाळगला त्या अभिमानासकट सारं काही मातीत पुरून टाकावंसं वाटलं. कॉलेजचा पहिला फ्रेंडशिप डे ते शेवटचा, असं सारं काही..

फ्रेंडशिप डेच्या दिवशीच तू माझ्याशी खास ओळख करून घेतली होतीस. कट्टय़ावरच्या मुलांना मी फारशी भाव द्यायचे नाही. तुझ्या तोंडात तर कायम सिगरेट आणि देव जाणे काय काय असायचं. हिप्पींपेक्षा फार काही वेगळा दिसायचा नाहीस. पक्का मवाली. म्हणूनच चार हात लांब होते तुझ्यापासून मी. अनेकदा जाणवलं होतं की, तुला माझ्याशी मैत्री करायची आहे. पण ज्या वातावरणातून, ज्या शाळेतून मी आले होते तिथे तुझ्यासारख्या मुलांशी मैत्री करणं म्हणजे ‘बाप रेच’ होतं. पण फ्रेंडशिप डेला येऊन तू ज्या प्रामाणिकपणे सांगितलंस की, तुला माझ्याशी मैत्री करायची आहे नि तू त्यासाठी एखाद्या संधीची वाट बघत होतास ते ऐकल्यावर मला पहिल्यांदा खूप हसायला आलं. अशी माझी मैत्री कोणाशी झाली नव्हती. पण मग तो प्रामाणिकपणा मला आवडला.. म्हणूनच तोवर अनुभवलेल्या सुरक्षित मैत्रीच्या जगाबाहेर पहिलं पाऊल टाकलं नि तुझ्याशी बेधडक मैत्री केली. जसजशी तुझ्याशी गप्पा मारायला लागले तसं कळलं की, इतकाही काही टपोरी नाहीस तू. तुझ्या कवितांमधून, गप्पांमधून व्यक्त व्हायला लागलास तू हळूहळू. किती उत्साहाने ऐकवायचास तू तुझ्या कविता. प्रत्येक पहिला जर्म शेअर केलास तू माझ्यासोबत. कॉलेज सुटल्यावर छानपैकी कॉफी पित कॅन्टीनमध्ये बसणं, पॉकेटमनी संपत आल्यावर एक वडा शेअर करणं, कॅम्पसमध्ये उगाच गाणी म्हणत कितीतरी वेळ फिरत राहणं, गेट-टू-गेदर, पिकनिकसाठी काही तरी झकास आयडिया काढणं, डिबेट कॉम्पिटिशनची तयारी म्हणून उगाचच वाद घालत बसणं असं काही बाही खूप शेअर केलंस माझ्यासोबत तू, तुझ्या टपोरी इमेजच्या पलीकडचं.. अर्थात यामध्ये तुझा ‘बर्ड वॉचिंग’चा छंद जोपासलास तू. तेही माझ्याकडेच शेअर केलंस. पण ते माझ्यासाठी हानिकारक नव्हतं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू शकले मी. कोणाचे ओठ कसे, कोणाचे केस कसे, कोणाची फिगर कशी या सगळ्या गोष्टी तुझ्या तोंडपाठ होत्या. किती फ्लर्ट होतास तू! आपण सगळे कट्टय़ावर गप्पा मारत बसल्यावर तुझी नजर असायची कॅन्टीनच्या दिशेने. कोण येतं, कोण जातं, कोणाला कसं पटवता येईल याची गणितं सुरू असायची तुझ्या मनात. पहिल्यांदा थोडं ऑकवर्ड वाटलं मला हे सगळं पण नंतर नंतर मीही त्यातल्या काही गोष्टी एन्जॉय करायला शिकले. असा टवाळपणा करायला आणि त्यातली धमाल अनुभवायला तूच शिकवलंस.
पण ते सगळं वागणं केवळ टाइमपासच्या पातळीवर होतं. त्यामध्ये कधी तरी इनोसंट विनोदही होता. मात्र या सगळ्यापेक्षा तुझं त्या दिवशीचं वागणं भयानक वाटलं मला. एखाद्या मुलीबद्दल किंबहुना कोणाबद्दलही इतक्या खालच्या पातळीला जाऊन कसं बोलू शकलास तू? एवढा विचार करणारा, संवेदनशील माणूस तू. म्हणूनच तुझं वागणं चुकलं हे दाखवून द्यावंसं वाटलं.
थोबाडीत मारणं हा कदाचित योग्य पर्याय नव्हता. पण त्या वेळी तुला समजावून देता आलं असतं का मला? तुझं ते बोलणं इतकं जास्त चिप लेव्हलचं वाटलं मला. लिमिट होती ती एखाद्या मुलीबद्दल वाईट गोष्ट ऐकायची; भले ते तू माझ्याबद्दल नव्हता बोललास आणि तुझ्यासाठी ते नॉर्मल होतं, पण माझा बेस्ट फ्रेंड असा असूच शकत नाही या विश्वासाचा तेव्हा पूर्ण चक्काचूर झालेला आणि त्या वेळी मी तुला समजून घेणं शक्यच नव्हतं. म्हणूनच एवढा संताप झाला माझा. कदाचित तुझा फार जास्त अपमान झाला असेल त्या वेळी. ज्या कॅम्पसमध्ये मानाने मिरवलंस, ज्या मैत्रिणीकडे कॉफीसोबत विचारही शेअर केलेस तिनेच तुला असं सर्वासमोर मारणं.. तू कदाचित खूप हर्ट झाला असशील. पण तरी आश्चर्य हे वाटलं की, तू उलटून मारलं कसं नाहीस मला? कदाचित शब्द जास्त रक्तबंबाळ करतात म्हणून असेल.. त्यानंतरचे शब्द जास्तच भयानक होते. दोघांनीही एकमेकांना काढलेले शाब्दिक बोचकारे. दुखावणारे. बोचरे. चिंधडय़ा उडवणारे.. खरं तर, ते शेवटचे शब्द होते आपल्या छान प्रवासातले. पण ते शेवटचे असूनही जपावेसे नाही वाटले आणि विसरताही नाही आले.. त्या मस्त प्रवासाचा शेवट असा वाईट झाला, हे दुर्दैवच.
पण एक नक्की की, तुला मारल्याबद्दल मला आजही वाईट वाटत नाही.

आजही तू विश्वास ठेवतोस का रे तुझ्या त्या वेळच्या शब्दांवर की, छान मैत्रीचा शेवट नसतो आणि असलाच तर तो छान असावा. मग आपली मैत्री का अशी संपली? की मग तो आपल्या मैत्रीचा शेवट नव्हता?
गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक क्षण आले तुझ्या आठवणी सोबत घेऊन. प्रत्येक आठवण हलकेच यायची, ओंजळीत उतरायची रेंगाळत-रेंगाळत आणि ती प्रत्येक आठवण चोळामोळा करून फेकून द्यायचे मी. तरीही ती प्रत्येक आठवण कोणत्या ना कोणत्या रूपाने माझ्या अवतीभवती जगत राहायची नि प्रत्येक वेळी कॉफी पिताना दिसायचा त्या ग्लासवर उतरलेला एक थेंब..

तुला माहिती आहे का, अजूनही आम्ही सारे फ्रेंडशिप डेला भेटतो. चार-पाच तास तरी एकत्र घालवतो. पण तुझ्याबद्दल कोणाचकडून कळत नाही. सगळ्यांशीच संपर्क तोडलास तू. माझ्याशी न बोलणं स्वाभाविक होतं. पण ग्रुपमधले बाकीचे? त्यांच्याशीही कॉलेज संपल्यावर बोलणं सोडून दिलंस? अजूनही तसाच फक्त वर्तमानावर विश्वास ठेवून जगतोस का? भूतकाळाचे धागे तोडलेला. भविष्याबद्दल बेफिकीर असलेला.. तुझ्या अवतीभवती रेंगाळत नाही का आमच्या सगळ्यांच्या आठवणी? आता कोणासोबत शेअर करतोस तुझ्या कविता, तुझे विचार.. की फाडून टाकतोस कोणालाच न सांगता लिहून झाल्यावर?
किती आठवतोयस तू आज?
सगळ्यांसाठी गिफ्ट घ्यायला आलेय. फ्रेंडशिप डे आलाय ना जवळ! गिफ्ट घेताना एक लहानसंच ग्रीटिंग दिसलं. त्याच्यावरचे शब्द खूप सुंदर होते. तो धागा पकडून तुझी कविता अलगद समोर अवतरली. गेल्या पाच वर्षांमध्ये तुझ्यासाठी कधीच गिफ्ट घेतलं नव्हतं. तो राग कदाचित शांत झाला नव्हता म्हणून असेल. पण यावेळी घेतेय. तेच छोटंसं ग्रीटिंग, ज्याने तुझी कविता पुन्हा जिवंत केली माझ्यासमोर. तुझ्यावरचा राग गेला म्हणून नाही पण त्यापेक्षा आपली मैत्री महत्त्वाची होती हे जाणवलं म्हणून घेतेय ही आठवण विकत.. आता यापुढे प्रत्येक फ्रेंडशिप डेला तुझ्यासाठी अशीच एखादी आठवण विकत घेईन आणि तू जेव्हा केव्हा भेटशील तेव्हा हे निसटलेले सारे फ्रेंडशिप डेचे क्षण तुला देईन. तू बोलत नसलास तरीही..

मैत्रीचे पहिले ते दिवस किती निरागस होते! म्हणूनच ते अजूनही ताजेतवाने वाटतात.
किती प्रश्न पडलेले तेव्हा! नवीन मैत्रीला नेमकं कोणत्या वर्तुळात समाविष्ट करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. तुझ्याशी मैत्री तर केली पण आता नेमका कसा मित्र ठरशील तू, अशी तुला ओळखायची धडपड सुरू झालेली. काही तरी घडायचं नि दर वेळी वाटायचं आता कळलास तू शंभर टक्के. पण खरं तर, तू शंभर टक्के कधीच नाही कळलास मला. आपल्या शेवटच्या भांडणानंतरही नाही कळलास सगळा. हिमनगासारखा बराचसा अनोळखी राहिलास. बेफिकीर, संवेदनशील, उर्मट, काळजी घेणारा, कुसका, न बोलता काही गोष्टी समजून घेणारा, फ्लर्ट आणि अशी असंख्य बरी-वाईट विशेषणं माझ्याकडून मिळालेला, न मिळालेला तू..

पण एक सांगू, आजही मला खात्री आहे की, कितीही नाकारलंस तरी आम्हा सगळ्यांचीच फ्रेंडशिप डेला तुला आठवण येत असणार. फक्त सारं उलगडून न दाखवणारा तू, ही फीलिंग्जही लपवून ठेवत असशील.
पण तरी, एखाद्या फ्रेंडशिप डेलाच मला नक्की भेटशील तू. विश्वास आहे माझा. मग सारं धुकं वितळून जाईल नि पुन्हा एकदा आपण अनोळखी बनून एका नव्या मैत्रीच्या नात्याची सुरुवात करू शकू!
mrunmayee.a@gmail.com

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ