Loksatta- balranga katha- after many many yers
| बंटीची फ्लॅट भजी |
भजी खायला तुम्हाला आवडते? येस्स. मला पण आवडते. बंटीलापण आवडते. आता हा बंटी कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बंटी म्हणजे माझा सगळ्यात लहान मित्र.
बंटी शाळेतून घरी आला आणि त्याला दुधासोबत खायला काय हवं, असं विचारलं की त्याचं पहिलं उत्तर असतं भजी. रोजचा एकच प्रश्न आणि रोजचं एकच उत्तर. सध्या तो भज्यांचा सॉल्लिडच फॅन झालाय. अर्थात त्याची आई त्याला रोज-रोज भजी खायला देत नाही, हे वेगळं. त्याच्या आईने, आजीने, ताईने त्याला खूप समजावून सांगितलंय की रोज असं भजी खाणं चांगलं नाही, पण त्याचा हट्ट काही केल्या संपत नाही. म्हणून मग त्याची आईही त्याच्या हट्टाकडे फारसं लक्ष देत नाही. तो मागतो भजी आणि त्याच्या समोर येतो उपमा, पोहे, कॉर्नफ्लेक्स, राजगिऱ्याचा लाडू वगैरे वगैरे. त्यातलं चोच मारल्यासारखं तो खातो आणि बाकी त्या प्लेटमध्ये तसंच पडून राहतं. कधी कधी त्याला भजी खूपच हवीशी असते. कुरकुरीत भजी, तोंडाला पाणी सुटणारी भजी.. पण आईने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही की त्याचा दुधाचा पेलाही जसाच्या तसाच राहतो. मग आधीच गोबरे असलेले त्याचे गाल आणखीनच फुग्गू होतात. असा तो रुसून बसला की त्याने हसावं, बोलावं म्हणून अख्खं घर त्याला मस्का मारायला लागतं. आई मस्त मस्त परोठय़ाचे रोल्स करते, ताई नवी गोष्ट सांगते, आजोबा नवीन गेम आणून देण्याचं प्रॉमिस करतात. पण या उपायांनीही त्याचा रुसवा कमी झाला नाही तर मग आजी आणि बाबा अखेर स्वयंपाकघराचा ताबा घेतात आणि मग स्वयंपाकघर भज्यांच्या वासाने दरवळून जातं. अर्थात अशी वेळ कमी येते. पण बाबा ऑफिसमधून आल्या आल्या जेव्हा असा स्वयंपाकघरात शिरतो ना, तेव्हा जाम धमाल असते. आजी कांदे, बटाटे, भोपळी मिरच्या कापून देते आणि बाबा मस्तपैकी शेफ बनून भजी तळत असतो. बंटी बाबाला अशा अवतारात बघून जामच खूश होतो..
मागच्या आठवडय़ातही असंच झालं. बंटीचा भजी एके भजी नि भजी दुणे भजीचा पाढा सुरू होता. बाबा ऑफिसमधून घरी आला. बिनसलेलं वातावरण बघून त्याने शेफगिरी न करता सगळ्यांना पटकन् रेडी व्हायला सांगितलं. त्याचा एक मित्र पुण्याहून आला होता. त्याच्यासोबत बाहेर जेवायला जायचं होतं. आईने बंटीला खूप समजावलं, पण भज्यांचा वास काही बंटीच्या डोक्यातून जात नव्हता त्यामुळे सगळं समजावणं त्याच्या डोक्यात शिरतच नव्हतं. बाबाचा मित्र वाट बघत असल्याने बाबाही स्वयंपाकघरात शिरला नाही. शेवटी आईने बंटीला बळेबळेच तयार केलं आणि सगळे बाहेर जायला निघाले. त्या दिवशी तर बंटीचे गाल आणखीनच टम्म फुगले. हे कमी म्हणून त्याच्या त्या टम्म फुगलेल्या गालांवरून डोळ्यातलं पाणी घळाघळा वाहात होतं. ‘बाबाला मित्र जास्त आवडतो. मी नाही,’ असे विचार त्याच्या डोक्यात येत होते. मग हॉटेलमध्ये गेल्यावर आपण पहिल्यांदा भजीच मागवू, असं त्याला प्रॉमिस केल्यावर त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबलं. पण गाल तसेच होते, रुसलेले..
बंटीच्या बाबाचा मित्र त्या सगळ्यांची एका छानशा मराठमोळ्या हॉटेलमध्ये वाट बघत होता. काकाबरोबर त्याची फॅमिलीही होती. हॉटेलमध्ये गेल्यावर फक्त नॉनव्हेजच खायचं असा बंटीचा आणखी एक हट्ट असतो. पण ते ज्या हॉटेलमध्ये गेले होते ते पूर्णपणे व्हेज होतं, त्यामुळे बंटीला आणखीनच राग आला. ‘बाबाने हे कसलं बकवास हॉटेल निवडलं? चिकन नाही, फिश नाही..’ समोर काकाची बंटीच्याच वयाची मुलं बसली असल्याने बंटीला आदळआपटही करता आली नाही. काकाची मुलं फारच शांत बसली होती. काकाची मुलगी तर बंटीपेक्षाही लहान होती. मग तिच्यासमोर बंटी चिडला, रडला असता तर पुढचे खूप आठवडे ताई त्याला बाळकोबा, चिडकोबा म्हणून चिडवत राहिली असती. पण त्याला राग तर व्यक्त करायचाच होता. त्यामुळेच स्टार्टर्स म्हणून फक्त बंटीसाठी मागवलेली भजी बंटीने खाल्लीच नाही. तो तस्साच बसून राहिला. आईने डोळ्यांनी दटावलंही. पण सगळ्यांसमोर ती ओरडणार नाही हे लक्षात आल्याने त्याने त्या मोठ्ठय़ा मोठ्ठय़ा डोळ्यांकडे दुर्लक्ष केलं. सगळ्यांची ऑर्डर देऊन झाली. ताईने काहीतरी वेगळाच पदार्थ मागवलाय, हे त्याच्या लक्षात आलं होतं. एव्हाना रुसून, रडून त्याला जाम भूक लागली होती. बाकीचं जेवण यायला वेळ लागणार होता. बंटीने भजी न खाल्ल्याने बाकीच्या सगळ्यांनी ती डिश संपवलेली. प्लेटमध्ये एकही भजं नव्हतं.. ‘दुष्ट.. सगळे..’
एवढय़ात ताईने मागवलेली डिश समोर आली. ब्राऊनिश कलरचं काहीतरी. त्यावर व्हाइट व्हाइट लोण्याचा क्युब. बाजूला चटणी.. दिसत तरी छान होतं सगळं. पोटातली भूक ताईच्या प्लेटमधलं ते थोडंसं काहीतरी खायला मागत होती. पण ताईने अजून स्वत:हून बंटीला खातोस का काही, असं विचारलं नव्हतं. त्यामुळे त्यानेच स्वत:हून ताईला कोपर मारून माझ्याकडे लक्ष दे, असं सुचवलं. ताई फस्स्कन् हसणार होती. पण तिला त्याचे फुगलेले गाल आठवले. बंटीने न खातासुद्धा रिकामी झालेली भजीची प्लेट दिसली आणि मग तिने आपलं हसू दाबलं. त्याचा चेहरा पाहून तिला कळलं की, बाळाला जामच भूक लागली आहे. मग तिने त्याला एक घास भरवला. पहिला घास पोटात गेल्यावर बंटी आणखीनच ताईजवळ सरकला. अजून दोन-तीन घास पोटात गेल्यावर त्याने आईला ओरडून सांगितलं,‘‘आई, ही तर फ्लॅट भजी आहे. आज्जी करते तशीच. पण जराशी फ्लॅट आणि जास्त क्रिस्पी.. इट्स मोअर यम्म.. आता घरीपण ही फ्लॅट भजी करत जा..’’
बंटीची ही प्रतिक्रिया बघून आई त्याच्याकडे बघतच राहिली. आता ताईही खो-खो हसायला लागली. मगाचंच दाबून ठेवलेलं हसू आता उसळ्या मारून मारून बाहेर आलं.
खरं तर, बंटीने आजवर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी होणाऱ्या पदार्थाची फारशी चव चाखलीच नव्हती. त्याने त्या दिवशी खाल्लेली फ्लॅट भजीही हा अशाच काही प्रकारांपैकी एक पदार्थ. अॅक्च्युअली, ते होतं थालिपीठ.
हॉटेलमध्ये ती फ्लॅट भजी आवडल्यापासून बंटीने आता ठरवलंय घरात तयार होणारे वेगवेगळे पदार्थ नखरे न करता किमान ट्राय तरी करायचे. म्हणजे अशाच आणखी एखाद्या टेस्टी, यम्मी फ्लॅट भजीचा शोध लागू शकेल...
Comments
Post a Comment