काचेपलीकडची एक गोष्ट



काचेपलीकडची एक गोष्ट

खूप महिने लिहायचं लिहायचं म्हणून डोक्यात होतं. लोकप्रभाला असताना हा विषय मोठा करायचा म्हणून ठरवलेलंही होतं. पण काही गोष्टी मागे राहून जातात. त्यावरचं काम कधी पूर्ण होत नाही. आज कदाचित मला माझं म्हणणं छापून आणण्यासाठी कोणाचे कोटस् नको आहेत, म्हणून हे लिहिणं शक्य होतंय. सहज, टाइमपास म्हणून मॉलमध्ये फिरताना सुचलेला हा विषय... काचेपलीकडची गोष्ट...
कोणती काच... काऊंटरची काच... त्या काचेपलीकडची मनं वाचण्याचा खूप प्रयत्न केला होता. कधी त्या मनांवर केवळ प्लॅस्टिकचं हसू दिसलं तर कधी फ्रेशरूममध्ये त्या मनांना तडा गेलेला पाहिलं. त्या मनात डोकावण्याची वाईट किंवा चांगली... सवय... नाक खुपसायला आवडत नाही पण कानावर पडल्यावर डोकावल्याशिवाय राहता येत नाही.
वाशीचा एक मॉल. तिथल्या फ्रेशरूम स्वच्छ करायला गेलेल्या दोन मुलींचं बोलणं...
“महागडे परफ्युम्स वापरणाऱ्या, महागड्या गाड्यांमधून फिरणाऱ्या आणि नेहमी बिस्लेरीचं पाणी वापरणाऱ्या या मुली टॉयलेट वापरल्यानंतर साधं फ्लशसुद्धा नीट करू शकत नाहीत का... आम्ही स्वच्छता ठेवतो म्हणून फ्लश करायला आम्ही असतो की काय...”
“आठ तास कोंदट वास सहन करून बघा... इथेच थांबायचं आणि तरी तोंडं वाकडी करायची नाहीत. इथला फिनाइल, एअर फ्रेशनर आणि इतर वास घेत या मुली तरी थांबू शकतात का...”
त्यांचं बोलणं ऐकल्यावर एक वेगळीच दुनिया समोर आली. काचेपलीकडच्या दुनियेची पहिली थेट ओळख.
पॉश मॉलमधलं फ्रेशरून क्लीन नसेल तर मॅनेजमेण्टच्या कारभारावर बोटं ठेवणारे आपण... कधी यासंदर्भात विचार केला नसतो ना...
पाचशे-हजारचे इअररिंग्ज, पाच-सात हजाराच्या पर्सेस, दहा-बारा हजारचे ड्रेसेस, साड्या ज्या मुलींकडून घेतो... शंभर-दोनशे रुपयांची पाणीपुरी, दहीपुरी ज्या दुकानात जाऊन खातो, हजार-पंधराशे रुपये ज्या पिझावर खर्च करतो, हे सगळं देणारी, पॅक करणारी, आपल्याला दाखवणारी माणसं कदाचित फक्त पाच-सात हजाराची नोकरी करत असतात. सेल्स पर्सन म्हणून त्यांना विकण्याची कला प्राप्त असते. पण त्यांच्या मनात विचार येत नसतील का... असं आपणही एखाद्या दुकानात जाऊन ऐटीत पंचवीस-तीस हजारांची खरेदी करून बाहेर पडावं, हातातल्या इको-फ्रेंडली बॅग्ज मिरवत मिरवत गाडीत जाऊन बसावं... हे विचार त्यांच्या मनात येत नसतील का... मला कायम पडतो हा प्रश्न... खरेदीच्या वेळी ते चेहरे वाचायचा प्रयत्न करते पण मध्ये काच येते...
ती काच खूप जाड आहे. त्यातून भावना आरपार जात नाहीत.  
खरं तर लिहायचं खूप होतं पण सगळंच मांडणं शक्य होत नाही. म्हणून किमान मुद्दे थोडक्यात व्यक्त व्हावेत असा प्रयत्न केलाय.
कधी त्या फ्रेशरूममधल्या मुलीला छानसं हसून थँक्स म्हटलं तरी तिला थोडं बरं वाटू शकेल... आपल्याला कधी कुठली जमीन स्वच्छ करायला लागेल, टॉयलेटस् धुवावे लागतील, जमीन ओली राहिल्याबद्दल ओरडा खावा लागेल असा विचार तिने कधीच केलेला नसेल. अशा ठिकाणी नोकरी करण्याचं तिचं स्वप्न नक्कीच नसेल... तिच्या अशा न पाहिलेल्या स्वप्नासाठी आपल्याला किमान थोडं तरी सॉरी फील झालं तरी काही बदलू शकेल... एक अशीच आशा... मॉलच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना आणि त्या काचा वितळताना निर्माण झालेली...

Comments

  1. अगदी ग, कित्ती खरं लिहिलस.... असा विचार करणारे फार कमी
    लिहित रहा ग, वेळ काढून :-)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ