चक्र
गेले अनेक दिवस लिहायचं
मनात आहे. पण लिहिलं जात नव्हतं. आज ठरवून लिहायला बसलेय.. सध्या सगळ्यांना
राजकारणाचा, निवडणुकीचा फिव्हर चढलाय. ट्विस्ट करायला नेमका कोणता मुद्दा मिळतो
याकडे सगळेच डोळे लावून बसलेत. हा नेता काय बोलतो, त्या नेत्याला काय उत्तर देतो,
त्याच्यावर कोणती टीका करतो, सगळ्याचा सारांश सांगितला जातोय. देशामध्ये
निवडणुकीचं एवढं वारं गेल्या वेळी नक्कीच नव्हतं. मध्यम वर्ग तसा दूर होता. पण
थँक्स टू सोशल नेटवर्किंग साईटस्. सगळ्यांनाच ज्ञानाचं वाटप होतंय. जाहीर
चर्चांमधून मेंदूला थोडी धार येतेय. ईक्स... पॉलिटिक्स म्हणणारेसुद्धा स्वतःचं
ज्ञान जरा अपडेट करतायत.
आम्हीही धावतोच आहोत..
सगळ्या घडामोडींच्या मागे.. काही दिवसांपूर्वी गारपीटग्रस्त आणि अवकाळी पावसाच्या
बातम्या मोठ्या मथळ्यात आम्ही छापत होतो.. ब्रेकिंग न्यूज करून चालवत होतो..
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आम्ही जगापर्यंत पोहोचवत होतो. पण राजकीय रॅलीज,
सभा मोठ्या झाल्या आणि आम्ही शेतकऱ्यांना विसरलो.. आत्महत्यांचं दुःख कमी झालं..
गळे काढून रडणारे आम्हीही अचानक सध्या आत्महत्या होतच आहेत असं म्हणत पुढे चालायला
लागलो.. हेडलाईनमधून तर या बातम्या गेल्याच पण पेपरमध्ये, बुलेटिनमध्येही घ्यायला
जागा मिळेना.. स्वतःला संवेदनशील म्हणत जगासमोर सत्य आणि वास्तव आणण्याचा डांगोरा
पिटणाऱ्या आमचा हाही एक चेहरा. जागा नाही, वेळ नाही. राजकारणाने आयुष्य एवढं
व्यापलंय. निवडणुकीनं आसमंत व्यापलाय. पण या निवडणुकीत महत्त्वाचा असणाऱ्या
सामान्य माणसाचं काय.. त्याला किती स्थान देतोय आम्ही? राजकीय टीकांच्या बातम्या
आणि सामान्य माणसाच्या समस्या याचा रेशो काढला तर.. उत्तर काय मिळतंय.. या राजकीय
टीका विरून जातील. निवडणुकीच्या निकालानंतर नवी समीकरणं तयार होतील. आम्ही जुनी
टीका आणि आजची गळाभेट असं चित्र एकाच वेळी समोर आणूही.. पण हे चित्र या पानावरून
पुढच्या पानावर पुन्हा असंच दिसेल. पण सामान्याचं काय, त्यांच्या समस्या सुटतील का? बदलाची आशा बाळगताना आम्ही
केवळ या रणभूमीत सुरू असलेल्या झुंजी पाहण्यात अडकून पडलोय असं वाटत राहतं. उच्चासनावर
बसून दुर्बिणी वापरून झुंजी पाहत बसलोय. काही दुर्बिणी आमच्या, काही उधार.. पण या
दुर्बिणीच्या कक्षेत सामान्य येत नाहीत ना.. सामान्यांच्या समस्या सोडवायचा वसा
घेतला होता ना आम्ही.. त्या खरंच सुटल्यात का.. हे पाहताना, त्या चक्रातून क्षणभर
बाहेर आल्यावर वाटत राहतं की हरवतोय का आम्ही आमच्याच दुनियेत.. आम्हीच
पांघरलेल्या बुरख्याखाली.. मुखवट्याखाली..
Comments
Post a Comment