माया...

प्रिय...
प्रिय म्हणू का तुला की नकोच.. कदाचित नकोच.. मग काय बरं म्हणू.. काहीच नाही म्हणणार. काहीच म्हटलं नाही तरी तुला कळेल नक्कीच की हे पत्र तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी आहे.
त्या दिवशी गुलझारजींचा लिबास सिनेमा इफ्फीमध्ये दाखवल्याची बातमी वाचली आणि आठवणी ताज्या झाल्या. लिबासच्या नाही.. इजाझतच्या.. माझ्याकडे एक कॅसेट होती. त्यात एका बाजूला इजाझतची गाणी आणि एका बाजूला लिबासची गाणी. दोन्ही बाजू किती वेळा माझ्या त्या वॉकमनमध्ये घासल्या गेल्या असतील माहीत नाही. एका ओळखीच्या मुलीने ती कॅसेट नेली. आणि खराब करून परत दिली.. रड रड रडले होते त्या दिवशी.. मग पुन्हा काही महिन्यांनी तीच कॅसेट विकत घेतली.. तेव्हा ठरवलं आता ही कॅसेट कोणाला द्यायची नाही.. कोण्णा कोण्णाला...
हळूहळू मोठी झाले. मग मोबाईलमध्ये गाणी सेव्ह करायला लागले.. इजाझत आणि लिबासची गाणी सेव्ह करून ठेवली सगळी.. जेव्हा जेव्हा सर्फिंग करताना इजाझत लागलेला पाहिला तेव्हा तेव्हा तिथे थांबलेय. काळ-वेळ विसरून तो सिनेमा पाहिलाय... मग एक दिवस त्या सिनेमाची डीव्हीडी मार्केटमध्ये आल्याचं कळलं. तो आनंद तर मला आजही सांगता येणार नाही. आता हवा तेव्हा मला तो सिनेमा पाहायला मिळणार होता. पण ती डीव्हीडी दादरला फक्त एकाच दुकानात उपलब्ध होती. आणि नेमकं मला त्या दुकानात जायचा योग येत नव्हता. दोन-तीन महिने गेले... चिडचिड होत होती. एक दिवसही दादरला जाऊन डीव्हीडी विकत घेऊ शकत नाही का मी...
आणि मग माझं हे इजाझत वेड पाहून एका मित्रानं वाढदिवसाला गिफ्ट दिली ती डीव्हीडी... सगळ्यात मस्त गिफ्ट.. नाचलेले ती डीव्हीडी पाहून.. आता मला केव्हाही तो सिनेमा पाहायला मिळणार होता. तो सिनेमा मोबाईलमध्ये घेता यावा म्हणून किती प्रयत्न केले मी.. पण अजून तरी मोबाईलमध्ये नाही तो सिनेमा.. असो..
तू आणि मी दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा तू सहज म्हटलंस तुझ्याबद्दल काही तरी सांग.. आणि मी सांगत बसले तुला इजाझतबद्दल... दादर ते अंधेरी प्रवासात फक्त आणि फक्त इजाझतबद्दल बोलले. मग तुला मेरा कुछ सामान ऐकवलं.. एवढा सिनेमाप्रेमी तू.. आणि तुला हे गाणं माहीत नव्हतं.. तुला हा सिनेमा माहीत नव्हता.. हत्... तुझं सिनेमाप्रेम.. मग तुला मेरा कुछचा व्हिडिओ दाखवला मी.. तुझ्या डोळ्यात त्या गाण्याची ओळख कुठेतरी पटताना दिसत होती... खूश झाले ज्याम मी.. मग तुला मी सांगितलं मला माया खूप आवडते.. मला तिच्यासारखं जगायचं होतं.. मुक्त.. मी कळायला तुला माया कळावी लागेल, असं सांगितलं... तुला पुढच्या भेटीत मी इजाझतची डीव्हीडी दिली.. वाटलं, तुला मी काय आहे, हे कळायला मदत होईल.. तुला आठवतंय.. तू मला विचारलं होतंस.. तुझा बॉयफ्रेंड कसा असावा असं तुला वाटतं.. तेव्हा मी तुला सांगितलं होतं की बाकी काही नाही पण त्याला मस्त बाईक चालवता यायला हवी.. तुला वेडेपणाचं वाटलं होतं ते उत्तर.. पण माझ्यासाठी माझं उत्तर तेवढंच होतं. असा कोणीतरी ज्याला मस्त बाईक चालवता येते.. त्यात काय मोठ्ठं.. बऱ्याच मुलांना येते.. मग तुला कोणीही चालेल का, असा तुझा प्रश्न.. पण माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.. आज सापडलंय.. ज्याला माया कळेल असंच कोणीतही हवं होतं..
तू खूप प्रॉमिस करूनही तो सिनेमा पाहिला नाहीस.. पाहिन गं.. एक दिवस नक्की.. पुढच्या वीक ऑफला.. दिवाळीत नक्की.. अगं उद्या संध्याकाळी.. कित्ती काय काय प्रॉमिसेस दिलीस.. पण इजाझत तुझ्यापर्यंत पोहोचलाच नाही. तुझ्या शोकेसमध्ये माझी डीव्हीडी तशीच पडून राहिली.. तुझ्या घरी आले तेव्हा मला ती दिसली.. बघ ना, एकदा तरी तो.. तुला मी कळणार कशी..
तुला मी कळलेच नाही..
तुझं-माझं भांडण.. कडाक्याचं.. अबोला.. मग काहीच न बोलता एकमेकांची गिफ्ट्स परत केली आपण.. तू विचारलंस अजून काही राहिलंय द्यायचं..
मी बाकी काहीच मागितलं नाही.. पण तू माझी डीव्हीडी परत दिली नव्हतीस. ती तू मुद्दाम विसरला होतास की खरंच विस्मरणातच गेली होती माहीत नाही. पण मला फक्त माझी डीव्हीडी परत हवी होती. ती परत घेता आली असती मला विकत.. पण घ्यायची नव्हती.. कोण दिली होती त्याला महत्त्व नव्हतं फारसं. पण त्या डीव्हीडीसोबत चिकटलेल्या क्षणांना महत्त्व होतं.. म्हणून..
तू शांतपणे ती डीव्हीडी परत केलीस. शोधत होते मी तुझ्या डोळ्यांत.. एकदा तरी मला सांगशील की मला माया समजली म्हणून.. नाही सांगितलंस.. आता कधी सांगशील की नाही माहीत नाही.. अजूनही वाटतं.. एकदा फक्त एकदा मायाला समजून घ्यायचा प्रयत्न केला असतास तर.. मीही कळले असते तुला.. थोडी थोडी..
असो..
ती पण स्वच्छंद.. मी पण..
ती पण मातीशी बांधलेली.. मी पण..
ती पण आकाशात झेपावणारी... मी पण..
म्हातारपण अंगाला चिकटण्याआधी, या जन्मात शक्य झालं तर मायाला समजून घ्यायचा प्रयत्न कर.. एकदाच प्रेमात पड तिच्या.. बघ, जगण्याचा काही वेगळा अर्थ सापडतोय का.. बघ, चेहऱ्यावर वेगळं, निर्भेळ हसू उमलतंय का..
तसं झालं तर माझी आठवण नक्की काढ.. भांडण मिटवायला तरी बोलेन तुझ्याशी..

-मृण्मयी

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ