तू की मी...
तू हरवलायस किंवा मी हरवलेय. किंवा
हे खरं नाहीय. तुझ्याशी गप्पा मारायचे तेव्हा कागद संपायचे पण विचार नाहीत. काही
ना काही सुचत राहायचं. कुठे नातं उलगडायचं तर कुठे भावना. काहीच नाही मिळाले तर
चार शब्द तरी फुटायचे. आता उगाच वाटतंय अशाच गप्पा मारतेय, तरी सुचत मात्र काहीच
नाहीय. वाटतं उलगडतंय पण ते तिथेच गुंतून पडून राहतं. अर्घवट. मग यातून नेमकं काय
निसटलंय. तू की मी...
चार वेळा काहीतरी लिहायचा प्रयत्न
केलाय आणि अर्घवट सोडून दिलंय. पुढचं काहीच सुचलं नाही म्हणून. माझ्या लिहिण्याचा
पालक होतास का तू.. त्याचं पालकत्व मीसुद्धा कधी स्वीकारलं नाही. की त्याचं
पालकत्व तुझ्याकडे होतं म्हणून मी त्याला स्वीकारलं नाही कधी.
तुला माहितीये, चंद्र येतो निघून
जातो. ट्रेनमधून जाताना त्याच्याकडे पाहायलाही विसरतेय.
तो पण शोधत असेल का रे मला जशी मी
आत्ता त्याला शोधतेय. पण हे या क्षणाचं बरं. तो दिसत असतो तेव्हा त्याच्याशी गप्पा
मारायला विसरतेय. पूर्वी ट्रेनच्या दारात उभं राहून कित्ती काय काय सांगायचे. कुठे
गेलंय ते सगळं.
खिडकीच्या काचेला डोकं टेकून गाणी
ऐकायचे. मग ती गाणी तुला सांगायचे. मग त्यात तू स्वतःची भर घालून सांगत राहायचास
हे ऐक नि ते ऐक. आता गाण्यांमागून गाणी कानावरून वाहून जातात. ती झिरपत नाहीत.
थांबत नाहीत. ओघळून सांडतात खाली. जमीन काँक्रिटची आहे. त्यामुळे ती गाणी ऐकलेल्या
मिनिटांचं तळं साचून राहतं भोवती. काय शब्द होते, त्यातलं काही जपून ठेवायचं होतं
का...
तुला माहितीय समुद्र उधाणतोय. क्षितिजावर
रंग उमटतात. पण त्याच्या लाटा मोजायलाही मी त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीय. त्या छटांना
गोळा करायला मी किनाऱ्यावर पोहोचत नाहीय. आठवतंय, वरळीला डोळे बंद करून लाटा मोजत
बसले होते. समुद्र उलटा कसा दिसतो हे शोधत होते. तेव्हा पण चंद्र होताच, आठवतोय
का... लाटांनी पण केवढा संवाद साधला होता तेव्हा. मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून
घ्यायचा होता तो आवाज. तू हसला होतास. सगळं काय साचवायचं असतं तुला अवती-भवती. सोड
की ते, सापडेल पुन्हा केव्हा तरी. किंवा नाहीच सापडलं तर शोध येऊन मुद्दाम. तेवढा
वेळ काढ. बघ आता लाटाच येतायत माझ्याशी गप्पा मारायला. आणि मी फक्त त्यांच्याकडे
जाता-जाता पाहतेय. येते म्हणून आश्वासनं देत. केला असता रेकॉर्ड तेव्हा तो आवाज तर
किमान तेवढा तरी सोबत असता. तो ऐकून तरी मी हरवलेय की तू ते कळलं असतं. पुन्हा
मोजता आल्या असत्या त्या लाटा तर तू हरवलायस हे कळलं असतं. नसत्या आल्या तर मी
हरवलेय हे उमगलं असतं.
बरं हे आजच का... आजच कारण, आज पण
खूप बोललेय. माणूस कळतो म्हणजे काय, हे शोधायचं होतं. पण ते नाही शोधता आलंय. तो
शोध अर्धवट राहिलाय. माणूस कळतो म्हणजे आपले त्याच्याबद्दलचे समज काय असतात हे
कळतं असं म्हणत होते मी. समज म्हटले की गैरसमज आलेच, असंही म्हटलं मी. मग माणूस
कळत नाही म्हणतो म्हणजे आपले गैरसमज झालेले असतात, असं काहीसं बडबडले मी. त्यापुढे
मात्र माणूस कळणं शोधता आलं नाही. पण हे शोधणं थोडे दिवस आणखी शोधेन म्हणतेय मी. तू
हरवलास की मी तेही सापडेल या शोध घेण्याच्या प्रवासात.
-मृण्मयी
Comments
Post a Comment