नाही मन निर्मळ...
तुझ्या गंगेच्या किनारी बसून शोधत होते गंगेचं पवित्रपण. तुला दिसलेलं. अर्धा तास पण नव्हते तिथे. पण त्या वेळात मला शोध घ्यायचा होता. तुला मिळणाऱ्या शांतीचा. तुला दिसणाऱ्या तिच्या पावित्र्याचा.
तुला कुठून दिसते तुझी गंगा निर्मळ... मला नाही दिसलं तसं काही. दृष्टीदोष असेल. सगळीच तर घाण केलीय तिला. तिच्याकडे टक लावून बघत होते. गढुळलेलं पाणी दिसलं. गढुळलेलं की बाटलेलं. काळसर होतं ते. तुला दिसायचा ना त्या पात्राचा तळ. पात्राच्या जवळ गेले ते शोधायला. पण नाही दिसला. कुठे चुकून मासे दिसत होते, म्हणून पटली ओळख तिच्या अजून जिवंत असण्याची.
मला आठवत राहिलं तिचं या पावसाळ्यातलं रुद्र रूप. लाल पाणी. जीवघेणं. प्रचंड भडकल्यावर फेकाफेक करत स्वतःच्या शांत होण्याची वाट पाहणारं. इथे पावसात किती पाणी असतं... स्वाभाविक प्रश्न होता तो. हे सगळं पात्र भरलेल असतं. एवढ्या आत तर येऊच शकणार नाही कोणी, मला मिळालेलं उत्तर. पावसाळ्यात येऊन पाहायला हवं, तिचा आवाज ऐकत एखाद्या जवळपासच्या दगडावर कान लावून झोपायला हवं. कदाचित तुला उमगलेलं तिचं नदीपण मलाही उमगेल.
जेव्हा एकटेपण पिऊन टाकायचं असतं तेव्हा मी गंगेच्या किनारी जाऊन बसतो, तू सहज बोलता बोलता सांगितलं होतंस. तुझा एकटेपणा ती पिऊन संपवते की तुला तो स्वतःच्या पोटात घ्यायला शिकवते. नाही कळलं मला. चंद्र डोक्यावर येईपर्यत थांबले असते तर कळलं असतं का...
नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर काही घरं दिसली. केवळं चित्रमय दृश्य होतं ते. ते मात्र मी डोळ्यांनी पिऊन घेतलं. पूर्वी किती छान असेल ना, जेव्हा झाडं असतील खूप. आता तर आजूबाजूला रंगीत इमारती झाल्या आहेत. तिकडचं दगडीपण फक्त पात्रापुरतं उरलंय असं वाटलं.
गंगा कशी दिसते तुला कसं सांगू... माझ्या नजरेने पाहिल्याशिवाय तुला ती कळणार नाही. हिच्या कुशीत बालपण खिदळलंय माझं... केवळ तू सांगितलं होतंस म्हणून मग बालपण बघायला लागले मी तिथे. आणि दिसलं रे...
त्या पात्रात असलेल्या उरल्यासुरल्या चिमण्या झऱ्यावर बच्चेकंपनी तुफान बागडत होती. तिथे मासेसुद्धा पकडत होती. त्यांची मनं प्रदूषित नव्हती म्हणून असेल. पण मला त्या झऱ्याच्या अलीकडचा पलीकडचा कचराच आठवत राहिला. तो झरा सांडून त्याचं पाणी वाहत होतं तिथे त्या पात्रात अडकले होते जरीच्या वस्त्रांचे तुकडे. निर्मळ बालपण ते दांभिकपण... अवघ्या काही फुटांचा प्रवास मला बोचत राहिला.
पात्राच्या दिशेने येताना किनाऱ्यावर ठेवलेल्या तुटल्या-फुटल्या मूर्ती. त्या मूर्तींच्या समोर बसलेल्या तेवढ्याच जुन्या आणि केविलवाण्या भासणाऱ्या आजी. का विकताय त्या तुटलेल्या मूर्ती. याच पात्रात सापडल्या असतील ना. माझ्या ओठांवर आलेला प्रश्न मी परतवून लावला होता. त्यांना कदाचित तो कळला असावा. मी जेवढ्या शोधक नजरेने ते पाहत होते तेवढ्याच शोधक नजरेने त्या माझ्याकडेही पाहत होत्या.
मला दिसली नाही यात तुझी लाडकी गंगा. तुला वेगळेपण जगायला शिकवलेली. मला त्या अर्ध्या तासात ते वेगळेपण माझ्या पोतडीत गुंडाळून घेऊन जायचं होतं, माझ्या शहरातल्या नदीसाठी. पाण्याचं सान्निध्य आपोआपच शांतपण देऊन जातं पदरात. मला माझ्या नद्यांसाठी पण हे शांतपण हवंय. गाळविरहित शांतपण. तुझ्या गंगेचं शांतपण. तिच्या जगण्याचं शांतपण. तुला सापडलेलं शांतपण.
तुला हे सारं सांगायला वेळ मिळाला नाही. अर्ध्या तासात कळणार नाही तुला गंगा म्हणून उडवून लावलं असतंस. तिचं तुझ्या बोलण्यातून जाणवलेलं पावित्र्य एखाद्या तरी काठावरून शोधून पाहायचंय. कदाचित माझ्या डोक्यात माझ्या शहरातल्या नद्यांचा गाळ घोळत असेल...
-अनुजा.
Comments
Post a Comment