वर्तुळ!

वर्तुळ!
रिया, तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली.
काय रे..
खरं तर लग्न ठरताना हे सांगायला हवं होतं पण राहून गेलं. माझी बहीण प्रेग्नंट आहे..
मग त्यात काय.. छान आहे की बातमी. त्यात लपवण्यासारखं काय होतं आणि आत्ता मुद्दाम का सांगतोयस. म्हणजे संदर्भ नसताना...
अगं असं नाही. राहून जात होतं ना. म्हणून.. आज आईने विचारलं की तुला सांगितलं का, तेव्हा मला आठवलं की हे सांगायचं राहून जातंय. अरेंज्ड मॅरेज आहे ना आपलं..
मग.. त्याने काही फरक पडतो का? मला कळत नाही अरेंज्ड मॅरेजचे रुल्स.
नाही गं! फरक पडत नाही. पण सांगितलं नाही असं व्हायला नको ना. तू घरी येशील लग्न करून तेव्हा सुरुची बच्चूसकट घरी असेल. ती घरी जाईपर्यंत गडबड असेल घरात. निवांत गप्पासुद्धा मारायला मिळणार नाहीत आपल्याला ती असताना.
ठीक आहे की, मी तिच्याशी गप्पा मारेन. तसंही तू मेसेंजरवर चिकटलेला असतोस. दोघं सोबत असतो तेव्हाही.
रिया यार... असं नाही. पण सवय झालीय आता. सुटेल हळुहळू...

सुरुचीचा चौथा महिना सुरू झाला तेव्हा रियाला अखेर शुभंकरने सांगितलं. अरेंज्ड मॅरेजमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्याने होकार नकार बदलतो असं त्याचं आणि त्याच्या घरच्यांचं म्हणणं होतं. मात्र रियाला अशा चौकटींना कधीच फार महत्त्व द्यायची गरज भासली नव्हती. तिला शुभंकर आवडला होता आणि तिच्यासाठी बाकी विषय तिथेच संपले होते. रिया आणि सुरुचीची छान गट्टी जमायला लागली होती. कधी ऑफिसला सोडशील असं सुरुचीने विचारलं की तिचं म्हणणं उडवून देणारा शुभंकर रियाला भेटण्यासाठी ऑफिसवरून येऊन कधी विरुद्ध रस्त्यावरही जायचा. त्यावरून सुरुची आणि शुभंकरची वादावादीही व्हायची. त्यावेळी रिया कायम सुरुचीची बाजू घ्यायची. सुरुची मैत्रीण झाली होती म्हणून नाही तर सुरुची योग्य वाटायची म्हणून. माणूस म्हणून समान वागणुकीची अपेक्षा असायची तिची.
शुभंकरच्या घरी खूप ऑर्थोडॉक्स वातावरण नसलं तरी काही गोष्टी मात्र पाळल्या जायच्या. चम्स सुरू असताना येऊ नकोस घरी आणि आलीस तर सांगू नकोस आईला अशी त्याने रियाला आधीच सांगितलं होतं.

पण का... यात लपवण्यासारखं काय आहे..
अगं होणारी सून आहेस तू. सुरुचीचे मेन्सेस सुरू असतात तेव्हा आई चार दिवस देवाजवळ दिवा लावत नाही. तू आलीस की तसंच करेल ती...
अरे पण हे चुकीचं आहे, हे तू सांगत नाहीस का तिला.. तू इंजीनिअर, सुरुची एमबीए होऊन या सगळ्या गोष्टी मान्य कशा करता तुम्ही?
हे बघ घर मम्मी-पप्पांचं आहे. त्यांचे काही नियम आहेत. ते नियम मोडावेत असा आग्रह मी धरणार नाही. ती जेमतेम दहावी शिकलेली आहे. तिला या गोष्टी माहीत नाहीत.
शुभंकर मग शिक्षणाचा उपयोग काय? आपल्या आजूबाजूच्या रीती-परंपरा चुकीच्या आहेत हे माहीत असताना तेच सुरू ठेवून काय मिळतं? कधी समजावून तरी सांग तिला. तिला माहीत नसेल पण तुला तर माहीत आहे ना?
मी सांगणार नाही. आणि रिया तूही त्या फंदात पडू नकोस असं मला वाटतंय. विषय संपला हा इथेच...
शुभंकर असं कसं... मी तुमच्या घरी राहायला येणार. त्यावेळी माझी पाळी आहे म्हणून देवासमोर दिवा लागणार नाही, हे मला गिल्टी फील देणारं ठरेल. माझ्या आईने मला कधीच असं वागवलं नाही. सुरुवातीला काही काळ लोणच्याला हात लावू द्यायची नाही पण तिच्या समजुती बदलल्या आणि मग या सगळ्यातून आमचं घर मोकळं झालं. दिवा न लावणं हे सगळ्या घरात दवंडी पिटवणारं आहे. यात प्रायव्हसी काहीच नाही. म्हणजे माझ्या नवऱ्याला पाळी कधी आहे ते कळावं. पण सासू-सासऱ्यांचं याकडे लक्ष राहावं, मग या महिन्यात या तारखेला आली, तारीख पुढे गेली का, पाळी चुकली का हे नकोय मला. आणि ही गोष्ट संपूर्णपणे पर्सनल आहे असं मला वाटतं.
रिया माझ्या बहिणीच्या बाबतीत व्हायचं की असं. आता ती नाही तू असशील. एवढा काय इश्यू करतेयस. पप्पांना काही फरक पडत नाही.
अरे पण मला पडतो ना...
बघू आपण नंतर. आत्ता नको हा विषय...

शुभंकरने विषयावर पडदा टाकला खरा पण रियाच्या मनात हा विषय खदखदत होता. एवढा शिकलेला मुलगा अशा चुकीच्या गोष्टींचं समर्थन कसं करतो, याचं कोडं तिला उलगडत नव्हतं. तिच्या डोक्यात विषय सुरू होता तोच शुभंकर म्हणाला की सुरुचीसाठी शॉपिंग करायचं. तिचा बेबी शॉवर अर्थात डोहाळ जेवण करायचं आहे. त्यासाठी तिला छान साडी घ्यायची होती. खास फोटो शूट करणार होते त्यामुळे तिला पार्टीसाठी ड्रेससुद्धा खरेदी करायचा होता. पार्टी ड्रेस तिचा नवरा सिंगापूरहून घेऊन येणार होता त्यामुळे साडी शुभंकरला घ्यायची होती.

रिया, पैठणी घेऊ का सुरुचीला. लग्नात तिला हवी होती पण तिच्या आजेसासूबाई म्हणाल्या की लग्न लागताना त्यांची पैठणी नेस त्यामुळे डिझायनर पैठणी घेता आली नाही. आता घेऊया चल...

शॉपिंगच्या नादात रिया पाळी, गैरसमज, अंधश्रद्धा साऱ्या गोष्टी विसरली. सुरुचीला पैठणी घेता-घेता शुभंकरने तिलाही डोहाळ जेवणाला घालायला ड्रेस घेतला, त्यामुळे ती खूश होती.
डोहाळ जेवण आठवड्याभरावर आलं असताना शुभंकरने रियाला फोन केला.

रिया, डोहाळजेवणाच्या आदल्या दिवशीच राहायला ये. मम्मीला मदत लागेल. मला चेन्नईला प्रोजेक्टला जावं लागेल. तू मदतीला ये आधीच. तशी जेवण वगैरे बाहेर ऑर्डर दिलीय पण त्यांना फोन करणं, आयत्या वेळी काही लागलं तर म्हणून एक दिवस आधीच ये. सुरुचीला पार्लरमध्ये जावं लागेल त्यामुळे तू सोबत राहा तिच्या. अथर्व येईलच आदल्या दिवशी...
तू डोहाळजेवणाला नाहीस? प्रोजेक्ट पोस्टपोन कर ना. नाही र काम आटोपून येना लवकर. डोहाळ जेवणाला तू नाहीस हे कसं काय रे..
अगं, सगळं सांगून झालं. नाही होत आहे काहीच अॅडजस्ट.
मग आपण डोहाळजेवण पोस्टपोन करू. घरचेच तर आहेत.
नाही. आठवा सुरू होईल पुढच्या बुधवारी. मग डोहाळजेवण करता नाही येणार. पुढचा रविवारच. माझ्यासाठी व्हिडिओ कॉल कर. मी सुरुशी बोलेन. आणि व्हिडिओ शूट तर होईलच.
हे बरंय ना. इंटरनेटने केवढी सोय केलीय. आपण लग्न पण असंच करूया...
काहीही काय? अरे सुरुची ओके आहे, ती काही म्हणत नाही तू कशाला असं म्हणते!
ठीक आहे. पण ती काही बोलत नाही म्हणजे तिला वाईट वाटलं नसेल असं नाही. जाऊ दे, जाईन मी शुक्रवारीच ऑफिसमधून घरी. आई येईल रविवारी एकटी. कॅब बुक करून देईन म्हणजे प्रश्न नाही.
आई?...
हो आई.. का रे...
अगं, तुला सांगायचं राहिलं.. आई नाही आली तर चालणार नाही का? म्हणजे नंतर एवढं एकटीला कशाला यायला लावतेस...
म्हणजे शुभंकर.. तुला काय म्हणायचंय?
अगं, म्हणजे काही नाही. आईला कशाला त्रास. साधंच तर डोहाळजेवण आहे. बिल्डिंगच्या हॉलमध्ये. त्यात एवढं मोठं काय?
शुभंकर तुला काहीतरी वेगळं सांगायचंय ना?
रिया... यार... मम्मी म्हणाली की विडोजना बोलवत नाही अशा फंक्शनला.
शुभंकर...

रिया हा धक्का सहनच करू शकत नव्हती.

तू काय बोलतोयस कळतंय ना तुला...
रिया, मी मम्मीला नाही ग विरोध करू शकत.
शुभंकर.. माझ्या आईचा एवढा अपमान इतर कोणी केला असता तर मी कानाखाली वाजवली असती.
रिया माझी गोची होते यात हे तर समज ना. मला बेबी शॉवरचं पण फार काही नाही. इट्स जस्ट फॉर सुरुची. वन मोअर रिझन फॉर हर हॅपीनेस. अँड डू यू बिलिव्ह इन ऑल दिज थिंग्ज.   
एक्झॅक्टली शुभंकर. आय डोण्ट बिलिव्ह इन ऑल दिज थिंग्ज. अँड दॅट इज द सेम रिझन आय अॅम कॉलिंग ऑफ धिस एन्गेजमेंट. आय डोण्ट बिलाँग टू युअर फॅमिली अँड थॉट्स.
रिया... तू वेडी झालीयस का. तू काहीही काय बडबड करत सुटलीयस.
नाही शुभंकर, मी त्या घरात आले तर वेडी होईन यात मात्र शंका नाही. आय डोण्ट बिलाँग देअर. आणि मी असले अपमान सहनही करणार नाही. माझ्या घरच्यांचे तर नाहीच नाही.
रिया एवढं टोकाला नको जाऊस गं. मी कधी असं वागवलंय का आईला तुझ्या. आय लव्ह युअर मॉम लाइक माइन.
शुभंकर नाही, मला या सगळ्याचा विचार करायची गरज आहे. या क्षणी माझ्याशी काहीच बोलू नकोस.

शुभंकरच्या या बोलण्याचा रियाला प्रचंड धक्का बसला होता. माणसाला माणूस म्हणूनही किंमत देता येत नाही, अशा घरात काय जायचं लग्न करून असा प्रश्न तिला पडला होता. तिने घरी येऊन आईला सांगितलं की मला या लग्नाबद्दल विचार करायचाय. आईने तिला खोदून विचारायचा प्रयत्नही केला. मात्र तिने काहीच सांगितलं नाही. न राहवून आईने शुभंकरला फोन केला तेव्हा तिला कळलं.
या सगळ्या प्रकरणातही आईने आपला तटस्थपणा सोडला नव्हता. आईच्याही मनात आलं की अशा घरात आपली मुलगी लग्न करून सुखी होईल का? पण शुभंकर चांगला आहे, याबद्दल तिला शंका नव्हती. तिच्या मनात आलं आपल्यालाही बदलायला वेळ लागलाच की. आपण पण लोणची, मुरंब्यांना हात कुठे लावू देत होतो रियाला. शक्यतो देव्हाऱ्यासमोर जाऊ नकोस असंही सांगत होतो. महिम्नकर बाईंनी काही गोष्टी आवर्जून सांगितल्या नसत्या तर आपणही तसेच राहिलो असतो. रियाचे वडील गेल्यावर तर कदाचित अधिकच देव-देव नि सोवळं-ओवळं करत जगलो असतो. शुभंकरच्या आईच्या आयुष्यात असं कोणी आलेलं नाही त्यामुळे त्यांना बदलण्याची संधीच मिळालेली नाही.

रिया ऐकशील का माझं...
तू शुभंकरची बाजू घेणार असशील तर बोलूच नकोस माझ्याशी. अतिशय पथेटिक मेन्टॅलिटी आहे त्याची आणि त्याच्या मम्मीची. लग्न तरी कशाला करतोय मग... मम्मीनेच सांगितलं असेल, बाळा मोठा झालास तू, कर आता लग्न म्हणून... त्यामुळे करत असेल लग्न. त्याच्या आईला वाटत असेल सुरु नाही घरी तर तिची रिप्लेसमेंट आणावी. मला नाही करायचं अशा माणसाशी लग्न. कणाच नाहीय त्याला.
रिया, अगं असं नसतं. तू कुठे मला विरोध करायचीस. देव्हाऱ्याजवळ यायचं नाही म्हटलं की फिरकायचीस का तिथे.
अगं पण तेव्हा मी लहान होते. मला अक्कल नव्हती. सारासार विचार करण्याची कुवत नव्हती. आता कळतंय पण. आता असं म्हणालीस तर करेन ना विरोध.
सारासार विचार म्हणालीस ना. मग तोच विचार कर ना. शुभंकर कधी बोलला का मला असं कधी. त्याची आई म्हणतेय. त्यांच्या घरात ती पद्धत आहे. आणि मला कुठे मोठा उत्साह आहे डोहाळ जेवणाला जायचा.
आई, तुला उत्साह असो वा नसो. पण बाबा नाही म्हणून तुला तिथे जायला मिळू नये, हे मला पटणारं नाही. कुटुंबातील माणसांनाच जर मान मिळत नसेल तर पुढे काय होईल माझं! आणि हो आज त्याची आई म्हणतेय डोहाळजेवणाला येऊ नको. उद्या तिने लग्नामध्ये तुला बाजूला राहा सांगितलं तर.. कन्यादान आणि इतर विधी तू करायचे नाही असं म्हटलं तर... माझ्या लग्नात माझी आई बाजूला राहणार ! वा! छानच की! अरे अशापेक्षा अशा मुलाशी लग्नच नको.
नक्की ना. एवढी ठाम आहेस तर दोन दिवस का रडतेयस तू. आवडलाय ना तो. शुभंकरने म्हटलंय का असं काही. सुवर्णमध्य काढूच की. तेव्हा मी ठामपणे उभी राहीन तुझ्या मागे. बघ नातं तोडणं सोपं असतं पण जोडून ठेवणं अवघड असतं. तो दोन दिवस सतत फोन करतोय तुला. तू त्याच्याशी काहीच बोलत नाहीस. तो तिथे लांब गेलाय. त्याला काळजी वाटत नसेल का. परवा बोलताना तोच रडवेला झाला होता.
आई, तू घेऊ नकोस त्याची बाजू. प्रचंड क्रूर आहे तो. विडोजनी यायचं नसतं असं मम्मी म्हणते सांगताना नाही का रडवेला झाला तो... इनह्युमन आहेत ते सारे. मी नाही म्हणजे नाही बोलणार. आणि मला लग्नही नाही करायचं त्याच्याशी. दोन का आणखी चार दिवस रडेन पण ते रडणं संपलं की संपेल विषय. आई त्या घरात आयुष्यभर रडेन मी.
रिया, सुरुचीचा तरी फोन घेशील का? तीसुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतेय तुझ्याशी. तिला का डोक्याला चिंता देते. तिचे चिंता करायचे दिवस नाहीत हे. इनह्युमन नाही का हेसुद्धा... किमान तिच्याशी बोल.

आईच्या या वाक्यापुढे रियाचा सपशेल पराभव झाला होता. सुरुचीचा काय दोष? तिला त्रास होऊ नये म्हणून सुरुचीशी ती बोलली. शुभंकर येऊ दे परत मग शांतपणे बसून बोला एवढंच तिने सांगितलं. तिने सुरुचीला हो म्हणून फोन बंद केला. सुरुचीचं डोहाळजेवण पार पडलं. शुभंकरने घरी रियाला असाइनमेंट असल्याने तीसुद्धा मुंबईबाहेर गेल्याचं सांगितलं. रिया एनजीओमध्ये कामाला असल्याने या कारणावर कोणालाही शंका आली नाही. शुभंकरच्या आईची होणारी सून दाखवण्याची संधी गेली होती. पण सुरुचीच्या काळजीत व्यस्त असल्याने तिचं या विषयाकडे दुर्लक्ष झालं होतं.
चेन्नईहून शुभंकर आला तेव्हा रिया आणि शुभंकर भेटले. रियाने हा विषय पूर्ण बंद करायचा असा निर्णय घेतला होता. मात्र शुभंकरला भेटल्यावर त्याला आपण किती मिस केलंय हे तिला जाणवलं. शुभंकरही तिला मिस करतच होता.

रिया, प्लीज लग्न नको मोडूस. मी आईशी बोलेन. मेन्सेसबद्दलसुद्धा. फक्त लग्न झाल्यावर काही दिवसांनी. आणि आईने मला तुझ्या मनातील भीतीही सांगितली लग्नाबद्दलची. कन्यादान आईला करायला नाही मिळालं तर.. रिया... तुझी भीती खरी आहे. मम्मी-पप्पांचं बोलणं झालंय. एन्गेजमेंटनंतर आईच्या नातेवाईकांनी तुझी आई पूजेला बसली होती हा मुद्दा उपस्थित केलाच. त्यामुळे माझ्या आत्याला तुझं कन्यादान करायला सांगायचं असं त्यांचं बोलणं सुरू होतं.
शुभंकर... हे असंच होणार आहे. आणि मला माझ्या आयुष्याचे डिसिजन दुसऱ्या कोणाच्याही हातात देण्यात काडीमात्र रस नाही. आपण लग्न न करणं जास्त चांगलं. आत्ता थोडा त्रास होईल पण तो संपेलही.
रिया, माझं पूर्ण ऐकून तर घेशील का? मी मम्मी-पप्पांना सांगतो की मला रजिस्टर लग्न करायचं आहे. नकोच पडूया त्या कन्यादान बिन्यादान फंदात. तुला रजिस्टरच करायंच होतं ना लग्न. सुरुला पण सांगतो तसं कन्व्हिन्स करायला. तिचं म्हणणं पप्पा नाकारणार नाहीत. प्लीज पण मला सोडून जाऊ नकोस. मला तू हवीयस आयुष्यात सोबत. तुझ्या नि माझ्या घरात गोष्टी खूप वेगळ्या असतीलही. तुला चुकीच्या वाटतील अशा गोष्टीही करेन मी. पण त्या सुधार. सोडून जाऊ नकोस. मी गेला आठवडाभर विचार करतोय. आय हॅव मिस्ड यू लाइक मॅड. मी मम्मीला तिथेच थांबवायला हवं होतं. पण आजवर कधी केलेलं नाही. ती बरोबर म्हणाली की बरोबर  आणि चूक म्हणाली की चूक असं खूप बाबतीत झालंय. फंक्शनमध्ये मी इन्व्हॉल्व्ह नसल्याने या गोष्टी रिअलाइज होत नाही. पण तुझ्या आईचा अपमान करायचा नव्हता मला... प्लीज लेट्स नॉट ब्रेक धिस रिलेशनशिप.
शुभंकर हे अवघड आहे सगळं.
हो पण सारं सोपं असावं असं नसतंच. करू की सोपं दोघे मिळून...

रियाचं मनपरिवर्तन झालं खरं. मग शुभंकरने ठरवल्याप्रमाणे मम्मी-पप्पांना कन्व्हिन्सही केलं रजिस्टर लग्नासाठी. फारशा कुरबुरी न होता चार महिन्यांनी लग्न पार पडलं. पूजा, देव-देवक, हनिमून सगळं छान पार पडलं. ऑफिसलाही सुरुवात झाली. लग्न ते हनिमून या काळात रियाने नवं नवं म्हणून गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. खरं तर तिला गळ्यात काहीच घालायची सवय नव्हती. पण शुभंकर म्हणाला राहू दे, म्हणून तिने राहू दिलं. ऑफिसला जायला लागल्यावर मात्र तिला मंगळसूत्र घालायचं नाही असं ठामपणे तिला जाणवू लागलं. आजूबाजूला अनेक विधवा, नवऱ्याचे घर सोडून आलेल्या, देहविक्रीमध्ये अडकलेल्या अशा अनेक महिला होत्या. त्यामुळे त्यांच्यासमोर हे मिरवणं तिला नकोसं व्हायचं. तिने शुभंकरला सांगितलं तसं. तेव्हा तो म्हणाला घराबाहेर पडलीस की मंगळसूत्र काढून ठेवत जा. घरात जाताना घालत जा. पण तिला खरं सांगायचं होतं. शुभंकर तिला घरात खरं सांगू देत नव्हता. ट्रेनमध्ये बसली की ती मंगळसूत्र काढून ठेवायची. घरी जाताना स्टेशन आलं की परत घालायची. तिला स्वतःलाच विचित्र वाटत होतं. बाहेर असताना कोणी पाहिलं तर.. ही सततची चिंता तिला खायची. लग्नानंतर शुभंकरचे मामा-मामी घरी आले होते. तेव्हा मामीने रियाला जोडव्यांबद्दल विचारलं. लहानसे कानातले घालण्याची सवय असलेल्या रियाला गळ्यात, पायातले हे दागिने अवजड वाटायचे. पूजेनंतर तिने जोडव्या काढल्या त्या परत घातल्याच नव्हत्या. तोवर मम्मीच्या लक्षात आलं नव्हतं. मात्र मामीने विचारल्यावर तिला मंगळसूत्रासोबत जोडव्याही घालायचं असं सांगण्यात आलं. लग्नाच्या प्रत्येक वर्षासोबत जोडव्यांचे फेर वाढवायचे. नवऱ्याला दीर्घायु मिळतं असं म्हणतात, असं जेव्हा मामीने तिला सांगितलं तेव्हा तिला हसूच आलं. ती ते हसू दाबूच शकली नाही. आणि पहिला भडका उडाला.
तुला जोडव्या घालाव्याच लागतील रिया.
मम्मी, मला या गोष्टी पटत नाहीत. मी नाही घालणार.
आपली भूमिका मांडण्यासाठी ही मोलाची संधी आहे असं मानून रियानेही आपला विरोध दर्शवला.
हे सौभाग्याचं लेणं आहे. तुला पटत नाही तर मला सांग तुझी आई कशी मंगळसूत्र घातले. ते कसं चालतं.
मम्मी तुम्ही काय बोलताय कळतंय ना तुम्हाला. मंगळसूत्र न घालणं मला पटत नाही. यात माझ्या आईचा संबंध काय. तिला मंगळसूत्र घालून सिक्युअर वाटतं. म्हणून ती घालते. आणि आई का घालते हे कसं तुम्ही विचारू शकता... माझ्याबद्दल बोलताय माझ्याचबद्दल बोला.
सिक्युअर वाटतं म्हणून आई घालते मंगळसूत्र. मला तुला तेच पटवून द्यायचंय. लोक बघत नाहीत मग आपल्याकडे गैरनजरेने.
मम्मी... मंगळसूत्र घातलेल्या बायकांवर बलात्कार होत नाहीत असं असतं का? मंगळसूत्र घातलं म्हणजे त्या बाईचा नजरेने अंदाज घेतला जात नाही, असं होतं का... तसं वाटत असेल तर शुभंकरलाच विचारा ना एकदा. तो कट्ट्यावर जायचा तेव्हा त्याने आजूबाजूला काय पाहिलं. मंगळसूत्र घातलेल्या बायकांकडे तो पाहत नव्हता का.. किंवा त्याचे मित्र पाहत नव्हते का.. मी जोडवीही नाही घालणार आणि मंगळसूत्रही. माझ्यासाठी शुभंकरसोबत असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हे दागिने मिरवण्यापेक्षा. मी जिथे काम करते तिथे या गोष्टी मला अजिबातच मिरवायच्या नाहीत.
रिया, हे सौभाग्याचं लेणं आहे.. अभद्र बोलू नकोस.
शब्दाने शब्द मग वाढतच गेले. लहान-मोठे खटके उडत होते. एकदा आपली भूमिका स्पष्ट केल्यावर मग पुढच्या वेळी रियाला लपवाछपवी करायची इच्छा होईना. तिने पाळीच्या संदर्भातील भूमिकाही स्पष्ट केली. पाळी आली की नाही हे मी सांगणार नाही. तुम्हाला लक्ष ठेवायचं तर ठेवा. पण ते मी येऊन सांगणार नाही, असं तिने सांगितलं. देवघरात दिवा न लावण्यामागची भूमिका काय हा प्रश्न केला तेव्हा घरात निगेटिव्ह वेव्ह्ज असतात असं तिला सांगितलं. तेव्हा दिवा लावून पॉझिटिव्ह वेव्ह्ज क्रिएट करता येतील असं तिने उत्तर दिलं. यावरून अर्थात आकांडतांडव होणार होतंच. शुभंकरने रियाला मी बोलण्याची वाट का नाही पाहिलीस असं ऐकवलं. तेव्हा मॅनिप्युलेशन करायची सवय नाही, प्रामाणिक राहणं जास्त सोपं असतं सांगून रियाने तो विषय संपवला. मम्मी मात्र दिवस मोजत, खुणा करत, अंदाज घेत देवघरात दिवा चार लावणं बंद करायची. शुभंकरचे पप्पा यात कधी तरी पडायचे मात्र ऑफिसमधील निवृत्तीनंतर ते शांतच झाले होते. हाताला सतत कामाची सवय होती त्यामुळे शांतपणा त्यांच्या अंगावर आला होता. ते मध्येच चिडचिड करायचे. मध्येच शांत व्हायचे. मुलीसोबत सिंगापूर फिरून आले तेव्हा उत्साहात होते मात्र नंतर ते डिप्रेशनमध्ये गेले. काऊन्सिलरकडे जायला ते वेडे नाहीत असं म्हणत शुभंकरच्या आईने या सगळ्याला विरोध केला. लोक काय म्हणतील, हा प्रश्न मोठा ठरल्याने औषधांवरच भागवले जात होते. समाज, लोक, परंपरा यापेक्षाही आपल्या मनाला काय पटतं हे जास्त महत्त्वाचं असतं हे सुरुची,  अथर्व, शुभंकर, रिया या चौघांनी सांगूनही ते ऐकलं जात नव्हतं. शुभंकरचे वडील घरातच बसून राहायचे. आईचंही बाहेर जाणं कमी झालं होतं. वडलांच्या काळजीने ती खंगत जाताना शुभंकरला दिसत होती. मात्र सर्व उपाय करून तो थकला होता.
रिया आणि शुभंकरच्या लग्नाला दहा महिने झाले. शुभंकर नुकताच एका प्रोजेक्टसाठी परदेशवारी करून परतला होता. महिन्याभराने परतलेल्या शुभंकरसाठी खायला काय करू नि काय नको असं त्याच्या आईला झालं होतं.  दुपारी जेवून सगळे मस्त झोपले. आणि संध्याकाळच्या चहासाठी बाबांना उठवायला गेल्यावर आईला कळलं की ते उठत नाहीत. डॉक्टर, अॅम्ब्युलन्स अशी सगळी धावाधाव झाली मात्र ही धावाधाव करून काहीच उपयोग नव्हता. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि झोपेतच ते गेले. घरात शांत, निवांत असल्याने त्याची कोणाला कल्पनाही आली नाही. अंत्यसंस्कारासाठी जाताना परंपरेचं पालन करत शुभंकरच्या आईच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. त्या काहीच बोलल्या नाहीत. रिया आतून फक्त धुमसत होती. तिने शुभंकरला हे थांबव सांगितलं. मात्र सुरुची, शुभंकर आपल्या नातेवाईकांपुढे मूग गिळून गप्प राहिले. फक्त ज्यावेळी मंगळसूत्र मागितलं तेव्हा त्याच्या आईने ते घट्ट धरून ठेवलं त्यामुळे ते न घेता पुढची प्रक्रिया पार पाडली. ज्या आईची मुलं या अघोरी गोष्टींना विरोध करत नाहीत, जी स्त्री हे सगळं सहन करते त्या स्त्रीसाठी मी भांडू तरी कशी दोलायमान अवस्था रियाची झाली होती. परंपरा म्हणून स्त्रीला किती सहन करायला लावाल असा प्रश्न तिच्या नजरेत होता.
पुन्हा एकदा रहाटगाडगं सुरू झालं. आईला बदल म्हणून सुरुची तिला सिंगापूरला घेऊन गेली. सुरुचीच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला. आई तिथे असतानाच सुरुचीला पुन्हा एकदा दिवस गेल्याची जाणीव झाली. बहिणीच्या प्रकृतीच्या काळजीपोटी शुभंकरने अबॉर्शनचा सल्ला दिला. मात्र सुरुची आणि अथर्व दोघेही आपल्या निर्णयावर ठाम होते. अबॉर्शनचं पाप आपल्या हातून होऊ नये असं म्हणून त्यांनी त्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. सुरुचीचं पहिलं बाळ, प्रेग्नन्सी यामध्ये त्यांची आई आपलं दुःख बाजूला ठेवून उभी राहिली. ती गुंतली. इथे रिया आणि शुभंकरलाही गुड न्यूजची जाणीव झाली. मुलाचं पहिलं मूल म्हणून त्याच्या आईची द्विधा अवस्था झाली मात्र शुभंकरने सुरुचीला सुरुवातीच्या काळात अधिक गरज असल्याचे सांगत परिस्थिती सांभाळाली. रियाच्या मदतीला रियाची आई आली.
सहा महिन्यांनी सुरुची आणि आई परत आल्या. तेव्हा सुरुचीला सहावा सुरू होता. सुरुची आणि आई परत आल्यावर काही दिवसांनी रिया आपल्या माहेरी गेली. सातवा लागला आणि पुन्हा एकदा सुरुचीच्या डोहाळजेवणाची चर्चा सुरू झाली. बाबा गेल्याने डोहाळ जेवण नको असं सुरुचीचं म्हणणं होतं. मात्र सुरुचीच्या सासूबाईंना आता नातवाची आस होती. त्यामुळे त्यांनी कुजबुजत्या स्वरात डोहाळजेवण व्हायला हवं असं म्हटलं. तिच्या आईनेही आता मुलीच्या पोटी तिचे वडील येणार अशी समजूत करून घेतल्याने डोळे पुसत त्यांनी डोहाळजेवण व्हावं असं म्हटलं. या सर्व विषयात न पडण्याचा आणि स्वतःला त्रास करून न घेण्याचा निर्णय रियाने घेतला होता. त्यामुळे ती फक्त फंक्शनला येईन एवढंच म्हणाली होती. पप्पांना जाऊन वर्षही होत नाही तोच हे सगळं बाजूला ठेवून आनंद कसा साजरा करतील सासूबाई, याचं उत्तर तिला मिळत नव्हतं.
सुरुचीच्या डोहाळजेवणाच्या वेळी तिच्या मामीने आईला तू ओटी भरू नकोस असं बजावलं. पप्पा गेल्यानंतर तिने स्वतःहून अनेक गोष्टी टाळायला सुरुवात केली होती. सिंगापूरला असल्याने यातील अनेक गोष्टींना तोंड देण्याची वेळ आली नव्हती. मात्र आता स्वतःच्याच मुलीच्या आनंदात सहभागी होता येणार नसल्याचे दुःख पचवणं मात्र तिला अवजड झाले होते. तिच्या आणि पप्पांच्या बेडरूममध्ये, स्वयंपाकघरात नातेवाईक असल्याने ती रिया आणि शुभंकरच्या बेडरूममध्ये आली. थकल्यामुळे रियाचा डोळा लागला होता. तिला अस्फुट हुंदक्यांनी जाग आली. तिने काय विचारलं आणि शुभंकरची आई लहान मुलासारखी रडत तिच्या गळ्यात पडली.
सुरुची ओटी भरायचीय ग मला.. हेच येणार तिच्या पोटी.. मला कौतुक करायलाही नाही मिळणार माझ्या लेकीचं...
त्या रडत राहिल्या काही वेळ आणि ती थोपटत राहिली. शुभंकर बाहेर या म्हणून बोलवायला आला तेव्हा ते दृश्य पाहून तो भांबावला.
मम्मी तू भर ना तिची ओटी. तुला कोण थांबवणार.. मी पाहतो काय ते, असं म्हणून तो पहिल्यांदाच ठामपणे उभा राहिला.  मात्र तसं करायला त्याच्या आईने नकार दिला. तोंड धुवून दोघी बाहेर जाऊन उभ्या राहिल्या. सुरुचीचं कौतुक भरल्या डोळ्यांनी पाहत सारे निघून गेल्यावर त्या ढसाढसा रडल्या.
रिया, तुझ्या आईला मी असंच वागवलं होतं. हे वाळीत टाकलं जाणं कसं असतं त्याची जाणीव झाली मला...
मम्मी.. झालं संपला तो विषय. मी आणि शुभंकर या विषयावर भांडून, लग्न मोडण्यापर्यंत येऊन पुन्हा एकत्र आलो. तुम्हाला सुरुचीची ओटी भरायची आहे ना. तुम्ही आता भरा. आता कोणीच तुम्हाला अडवणार नाही. लेकीचं मनसोक्त कौतुक करा... , रियाने त्यांना सांगितलं.
सुरुचीनेही आईने ओटी भरावी म्हणून आग्रह धरला. तिचा आग्रह डोळे टिपतच आईने पूर्ण केला. त्या क्षणी रियाने मनाशी खूणगाठ बांधली.
सुरुचीचं डोहाळजेवण केलं म्हटल्यावर रियाचंही करूया असं नातेवाईकांनी म्हटलं. रियाला या गोष्टींनी खरं तर फरक पडणार नव्हता. मात्र तिने केलेला निश्चय पूर्ण करण्याची वेळ आली होती. त्यामुळे तिनेही या प्रस्तावाला होकार दिला. फक्त हे डोहाळजेवण ती सांगेल त्या ठिकाणी होणार, अशी अट तिने घातली.
तिच्या संस्थेच्या हॉलमध्ये डोहाळजेवण व्हावं असं तिने शुभंकरला सांगितलं. रियाला विरोध करण्यात अर्थ नव्हता हे समजून त्यानेही हो म्हटलं.
रियाच्या संस्थेच्या हॉलमध्ये आल्यावर शुभंकरच्या नातेवाईकांच्या भुवया उंचावल्या होत्या. संस्थेच्या माध्यमातून ज्या विधवा, देहविक्रीच्या व्यवसायात अढकलेल्या, नवऱ्याचं घर सोडून आलेल्या महिलांना मदत केली जायची त्या महिला तिथे जमल्या होत्या. संस्थेमध्येही काम करणाऱ्या अशा महिला होत्या. या महिलांनी तिची गेले सहा महिने छान काळजी घेतली होती. तिची खाण्यापिण्याची हौस पुरवली होती.
ओटी भरण्याच्या कार्यक्रम सुरू झाला तसा शुभंकरची मामी पुढे आली. मात्र रियाने त्यांना थांबवून आपल्या आई आणि सासूबाईंना पुढे बोलावले. त्यांच्याकडून ओटी भरून घ्यायची असल्याचे तिने सांगितले.
अशा कार्यक्रमांना फक्त सवाष्ण महिलांना मान मिळतो. माझा बाबा गेल्यापासून आईनेच मला मोठं केलं आहे. त्यामुळे आजचा पहिला मान तिचाच आहे. मम्मीनेही गेल्या सहा महिन्यांमध्ये आणि त्यातही सुरुच्या डोहाळजेवणाला कधी विचार न केलेली परिस्थिती अनुभवली. त्यामुळे मला त्यांचा मान त्यांना परत करायचा आहे. हे त्यांच्या मुलाचंही बाळ आहे. त्यामुळे या बाळाच्या दोन्ही आज्यांकडून मला माझी ओटी भरून घ्यायची आहे. या आज्यांसोबतच माझं बाळ जी परिस्थिती पाहत मोठं होत आहे. ज्या मावश्यांकडून त्याचे लाड आतापासूनच होत आहेत त्या सगळ्यांना मला हा मान द्यायचा आहे. ओटी भरणं हे कौतुक आहे तर मला या सगळ्या हक्काच्या माणसांकडून हे कौतुक करून घ्यायचं आहे. यामध्ये कोणीच नवरा नसल्याने मागे सुटलेलं मला आणि माझ्या बाळालाही आवडणार नाही. नवरा नाही म्हणून माणूस म्हणून आनंद मिळवायचा तुमचा हक्क आम्ही दोघंही नाकारणार नाही. हा आनंदाचा हक्क आजच्या दिवशी सगळ्यांना मिळावा अशी माझी इच्छा आहे, म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी ही ओटी भरावी अशी माझी इच्छा आहे.
रियाचं ते डोहाळजेवण तिथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठीच एक वेगळा अनुभव होता हे वेगळं सांगायची गरज नाही. या सोहळ्याच्या निमित्ताने सहानुभूती, आस्था, प्रेम, कणव, जिव्हाळा, सहवेदनेची जाणीव या सगळ्या भावनांनी रिया आणि तिचं बाळ आणखी श्रीमंत झालं होतं.
-अनुजा चवाथे

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ