वेध

हायवे मूव्ही पाहिला तेव्हा पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर, लडाख असा वेगवेगळ्या प्रांतातून प्रवास करायला जाम टेम्प्ट झालं होतं. हायवेमधलं प्रत्येक गाणं पाहते तेव्हा अजूनही हेच वाटतं. मनमुराद प्रवासाकडे मन ओढलं जातं. पण गाडीतून नाही. ट्रकमधूनच. बसच्या टपावरून. मग विचार करत बसले होते. मी ट्रक ड्रायव्हर असते तर. एवढा प्रवास नीट केला असता का. रस्ते प्रवासाचा त्रास बिस होतो. गाडी बिडी लागते. ट्रक ड्रायव्हर असते आणि गाडी चालवताना असा त्रास झाला असता तर... 
हाच प्रश्न मला एसटी, बस ड्रायव्हच्या बाबतीत पण पडतो. एसटीची ड्रायव्हर असते तर काय केलंं असतं.. एवढ्या लोकांना सांभाळणं तर दूरच स्वतःला सांभाळू शकले असते का.. किती पेशन्स ठेवून एसटी चालवत असतील हे एसटीचालक.
म्हणजे जिथे आपण टिकू शकत नाही हे माहीत असतं तिथे टिकेन का असं इमॅजिन करून पाहायचं. उगाचच. म्हणजे कदाचित त्यांचे कष्ट लक्षात येतात. किंवा ते किती कठीण असतं हे कळतं.
काल ससून डॉकला गेले होते. ससूनला एक प्रदर्शन सुरू होतंय. ससून जाता-येता पाहिलं होतं पण आत कधीच गेले नव्हते. माशांच्या वासापासून तसा लहानपणापासूनच पळ काढलाय. काल ससूनला गेले आणि काही अंतरापर्यंत वास नव्हता. मात्र नंतर एकदम उग्र वास आला. बर्फाच्या कारखान्याजवळ तर उभंसुद्धा राहवेना. पण तिथल्या किनाऱ्यावरच्या बोटींनी जाम भुरळ घातली. एक खिडकी. त्या खिडकीच्या चौकटीवरून दिसणाऱ्या अमाप बोटी. डोक्यात फ्रेम फिट्ट बसली.
बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या ऑफिसच्या बाजूने दिसणारे बाजूच्या जेट्टीवरचे दगडी बांधकाम. जामच जुन्या चित्रपटातल्यासारखं. किले का रहस्य टाइप... त्याचीही भुरळ पडली. केवढं काय काय होतं तिथे पाहण्यासारखं..
ते पाहून बाहेर पडताना एका भित्तीचित्राकडे आमचे फोटो जर्नलिस्ट ओढले गेले. तोसुद्धा कारखाना होता. तिथे लहान-लहान मासे, कदाचित कोलंबी किंवा तत्सम काहीतरी तिथला कर्मचारी एका मोठ्या लांबलचक दांड्याच्या फावड्याने एकत्र करत होता. त्यातले काही मासे कदाचित त्या पात्याखाली क्रशही झाले...
खरंच ते पाहवेना... वास तर होताच. पण दृश्य जास्त डोक्यात खिळे ठोकत राहिलं. तरी बरं अलीकडेच सुरमई खाल्लीय मी.
सोबत असलेल्यांना मी बाहेर थांबते असं सांगून ससून डॉक या परिसराच्या गेटबाहेर येऊन थांबले. मोकळा श्वास घ्यायचा प्रयत्न केला. पण काही तरी डोक्यात, मेंदूत, श्वासात गडबड होत होती.
ती पंधरा-वीस पावलं चालताना डोक्यात विचार येत होता मी इथे जन्मले असते तर. मग मला सहन करता आलं असतं का.. मी त्याचाच भाग झाले असते. मग मला असं काही फील झालं असतं का... सवय महत्त्वाची असते का.. आमच्या घरी लहानपणी शिजायचे की मासेही. अलीकडे कमी झालंय प्रमाण. खूपच कमी. मग नेमकं काय. सवय. स्वभाव. अनुभव. या सगळ्याचं कॉम्बिनेशन ऑड वाटणाऱ्या गोष्टींवर मात करू शकतं का...
मी माशांमध्ये खेळू शकले असते का...
मी एसटी ड्रायव्हर होऊ शकले असते का..
मी अरुंद घाटांमधून ट्रक चालवू शकले असते का...
की मी तिथेही फक्त लिहिण्याची संधीच शोधत राहिले असते...
मी कदाचित लिहिलं असतं माशांच्या खवल्यांवर...
मी कदाचित लिहिलं असतं दरीमधल्या ढगांवर...
मी कदाचित लिहिलं असतं घाटांमधल्या दगडांवर...
ते जगतानाही शब्द-शब्द खेळले असते आयुष्यभर...

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ