एक स्पेशल चाय

माझा मित्र अलीकडेच मला जेमतेम दहा मिनिटं भेटून गेला. तब्बल वर्षाने भेटलो. दहा मिनिटांमध्ये अधाशासारखं बोलले मी. हे सांगायचंय, ते सांगायचंय. जसं फोनवर बोलतंच नाही. पण तरी खूप सांगायचं होतं नि वेळ कमी होता. मग धड काहीच झालं नाही. फक्त भेटल्याचा आनंद. किंवा पुढच्या वर्षभरासाठीचं गाठोडं.

गेल्या महिन्याभराबद्दल त्याला खूप काही सांगायचं होतं. उलथापालथी, मजा असं खूप काही. नि त्यातलं काहीच सांगितलं नाही. उगीच सांगितल्यासारखं केलं. आगापिछा नसताना दोन चार वाक्यं झाली नि दोघंही आपापल्या वाटेने निघून गेलो. वाईट पण वाटून घेता येत नव्हतं कारण समोर काम होतं. त्याला म्हटलं वाईट पण वाटून घ्यायला वेळ नाही. नि त्याचा काहीच रिप्लाय नाही...

काल फोन बदलला तेव्हा बरेचसे नंबर गायब झाले. त्याचाही गायब झाला. त्याला म्हटलं सेव्हच करणार नव्हते तुझा नंबर. काहीही सांगत बसते तुला. पण केलाच फायनली सेव्ह नंबर.

इमोशनल अप-डाऊन फेस करताना मित्रमैत्रिणी केवळ सोबत असणं खूप महत्त्वाचं असतं. ते किती जवळ आहेत, किती लांब आहेत याने फरक पडू नये. पण ज्यांना असे मित्रमैत्रिणी नसतात त्यांचं काय. म्हणजे नवरा-बायको मित्र असावेतच असं काही गरजेचं नाही. एकमेकांनाही जे सांगता येत नसेल ते कुठे व्यक्त होत असेल. कोंडमाऱ्याला कसं तोंड देत असतील.

कधी-कधी आपण बेस्ट फ्रेंड नाही होऊ शकत. पण ऐकू शकतो. ऐकणारे कान व्हायचं. गाणाऱ्याच्या सुरात हळूच सूर मिसळायचा. नाचणाऱ्याच्या तालावर ठेका धरायचा. एकटं नाही तुम्ही असं जाणवून द्यायचं. माझ्यासाठी तो तेच करतो. डिप्रेस्ड असले नि त्याला सांगितलं की माझं बोलणं ऐकायला एखाद्या चहाच्या टपरीजवळ येऊन उभा राहतोच. मी तो नाही बनू शकत. इतर अनेकांमध्ये तो आहे का, असं शोधलं तरी ते मिळत नाही. मैत्रीच्या स्वार्थी भावनाही वेगवेगळ्या असतात. तात्पुरत्या असतात. पण त्याने जे मला दिलंय किंवा देतोय ते खूप महत्त्वाचं आहे. मीही कधीतरी इतरांना तेच द्यायचा प्रयत्न करते. मग कदाचित माझं मीपण लहान होऊन जातं.. 

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ