भिंती
याला हेच नाव का.. असंच. उलगडेल ते. पहिल्याच
वाक्यात सगळं कसं सांगायचं. लिहायचं की नाही असं सतत विचार करत होते. काय लिहायचं,
कसं लिहायचं.. पण लिहितेय. अर्थात यालाही विरोध होईल. यातले काही विचार पटणार
नाहीत. पण बंधन आहे कुठे तसं. मी लिहिलेलं वाचलं म्हणजे ते पटलंच पाहिजे नि तेच
विचार बरोबर असं नाहीय. नाही पटलं तर वाचा नि पुढे चालू लागा. पटलं तर काय करायचं
तुम्हीच ठरवायचं. मी फक्त लिहिणार.
कांदिवलीच्या शाळेतून दुसरीत पार्ले टिळकमध्ये
आले. शाळा नकोशी व्हायची मला. सगळे मित्रमैत्रिणी मागे सुटले होते. नव्या शाळेत
कोणीच ओळखीचं नव्हतं. अंधेरीच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या दोघी मैत्रिणी वेगळ्या
शाळेत. जामच वाईट वाटायचं. पण दुसरीतलं वाईट वाटणं हळूहळू मैत्रिणी मिळाल्या तसं
मागे सरलं.
तिसरी.. तिसरीत आल्यावरच चार आठमध्ये जायचंय हे
ऐकू यायला लागलं. कसं, कुठे आठवत नाही. दि ला स्कॉलरशिप मिळाली होती. त्यामुळे
मलाही ती मिळवायचीच होती. म्हणून तिसरीचा अभ्यास. मार्क कसे कमी मिळाले.. मला काय
माहीत मार्क कसे कमी मिळाले.. अजूनही नाही माहीत. मला पाठांतर बिठांतर कधीच जमलेलं
नाही. मला फक्त लिहायला जमतं. पाठांतर म्हटलं की गाडी फम्बललीच. असो. चार-आठ हा
वर्ग स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना शाळेतून मिळणाऱ्या खास कोचिंगसाठी होता.
त्यामुळे तिसरीतलं टार्गेट चार-आठ. मग चौथीतून पाचवीत जाताना पार्ले
टिळकवाल्यांसाठी दोन टार्गेट होती. एक तर स्कॉलरशिप मिळावयची नि दुसरं टार्गेट
पाच-नऊ.. शाळेमध्ये टार्गेट-टार्गेट खेळलोय यार आपण.
घरी अभ्यास घेणारं कोणीतरी होतं. किंवा कानीकपाळी
कोणीतरी ओरडणारं होतं. किंवा बुचा अर्थात बुद्धिमत्ता चाचणी नि मराठीच्या बाबतीत
म्हटलं तर मजा यायची ते करायला, त्यामुळे असेल. अभ्यास करायला लागले मी. पुढचं
टार्गेट अचिव्ह झालं.
आता मागे वळून पाहताना वाटतंय की या वळणावर त्या
विषयांची गोडी लागावी म्हणून काहीतरी घडलं. छान पुस्तकं मिळणं, त्यातली कोडी
सोडवायला येणारी मजा. असं काहीतरी इंटरेस्टिंग घडत गेलं.
पण प्रत्येकाला नाही मिळत हे. नि मग भिंती उभ्या
राहतात. एक तुकडी ते नऊ तुकडी अशा. वर्गांच्या तर या भिंती होत्याच. पण कदाचित
मनातही.
सात, आठ, नऊ तुकड्या हुशार. वगैरे समज मग
रुळायला लागले मनात. त्यातही नऊ तुकडीचा तोरा. हे समज कसे झिरपत गेले माहीत नाही.
पण खूप खोलवर झिरपलेले होते. केवळ एवढेच समज नाहीत तर काही मुलं कशी वाईट असतात
हेही समज. शाळा सुटल्यानंतर वीस वर्षांमध्ये फार कोणाशीच बोलणं झालं नाही. मग हे
समज दृढ होत गेले.
२००५ साली कदाचित, आमचं पहिलं गेट टूगेदर झालं.
८ आणि ९ तुकडीचं. कुठेतरी असाइनमेंटला होते. नाही जाऊ शकले त्याला. पण वाईट वाटलं
नव्हतं खूप. थोडंसं मिस केलं. पण थोडंसंच. मधल्या काळात शाळेत फारशा न बोललेल्या
एक-दोन वर्गमित्रांशी बोलायला लागले. ज्या वर्गमित्रांशी बोलायचे त्यांच्याशी
एव्हाना बोलणं बंद झालं होतं. आम्ही तास-तासभर गप्पा मारलेल्या आहेत. काळ बदलतो.
त्यामुळे प्राधान्यक्रम बदलून आयुष्य पुढे सरकलं. बरं या मित्रांशीही खूप संपर्क
होता असं नाही. पण होता. फेसबुक आलं. मग फेसबुकवर खूप फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून
झाल्या. खूप स्वीकारून झाल्या. पण गप्पा होत नव्हत्या. त्यातच २०१३ साली फोनवर व्हॉट्स
अॅप नावाची गोष्ट आली. ऑफिसचे
तर ग्रुप होतेच. जुन्या ऑफिसचेही झाले. आणि मग असंच वाटलं की आपल्या शाळेतल्या
क्लासमेट्सचा पण ग्रुप हवा. नि हिंमत केली. अनेक जणांना पर्सनल मेसेज केले.
अनेकांना फेसबुकवरून संपर्क साधून सांगितलं की असा ग्रुप तयार करतेय. त्या ग्रुपचा
भाग होणार का.. बरं शाळेतली इमेज दैनंदिनीमध्ये नाव लिहिणारी मुलगी अशीच होती.
शाळेत वर्गातल्या मुलांशीही यावरून पंगे घेतले होते. आणि मग माझा मार्ग जामच बदलला
होता. शाळेतले ग्रजेसही दीर्घ काळ होते. तो मुलगा टवाळच आहे, हा मुलगा जामच फ्लर्ट
आहे, तो केवढा मुलींकडे पाहायचा...
असं केवढं तरी
सोवळ्यातलं..
हे सगळं बाजूला ठेवून
पुढे यायला मैत्री हा एकच पर्याय होता. ग्रुप बनवताना टेंशन होतं. आधीच्या
इमेजमुळे अनेक जण नाही म्हणतील ग्रुपमध्ये यायला ही भीती होतीच. पण अनेकांनी
सकारात्मक प्रतिसाद दिला. काहींनी नाही दिला. ग्रुपमध्ये भांडणं झाली, वाद झाले...
अनेकांनी ग्रुप सोडला. परत आले.. मीसुद्धा केलं तसं.. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये
जाणवलं की बॉण्डिंग वाढतंय. मला मवाली वाटणारा एखादा मुलगा चांगला असू शकतो. माझं
परसेप्शन मी बदलू शकतेय का हे महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षी पुन्हा एक गेट टूगेदर
झालं. यावेळी मात्र मी उत्साहाने सहभागी झाले होते. मलाच भेटायचं होतं अनेकांना. आणि
आता तर अनेकांशी नव्याने मैत्री झालीय. शाळेत ज्यांच्याशी बोलले नव्हते
त्यांच्याशीही. बरं यात मोठं आहे का काही... तसं पाहायला गेलं तर नाहीच. आपण होतो
की मोठे. मग असली ओझी किती काळ उचलायची. पण तरी आपण उचलतो.
सध्या आमच्या अख्ख्या
बॅचचं गेट टूगेदर करायचं म्हणतोय. सगळ्या नऊ तुकड्या. या नऊ तुकड्यांमध्ये आठ आणि
नऊकडे इतरांचा पाहण्याचा आणि आठ आणि नऊचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन तेव्हा
वेगळा होता, हेसुद्धा मला आवर्जून सांगायचंय. पण ते तेव्हा. आता नाही. भिंती
बांधल्या गेल्या. त्या तोडता येतात. माणसंच आहोत. एकाच वयाची. स्वभाव वेगळे
असणारच. पण एक नक्की बोललं की विषय सुरू तरी होतो नाही तर संपतो तरी. त्यामुळे
बोलायला तर हवंय. मनात भीती असेल कदाचित. मान्य.. पण ती एकमेकांशी बोलल्याशिवाय
खरी की खोटी ते कसं कळणार. कम्फर्टेबल नसणं. हेही मान्य. पण ही फेजही बोलल्याशिवाय
ओलांडता येणार नाही. आपण तिसरीपर्यंत सारे एकत्रच होतो की. चौथी, पाचवी आणि आठवी
या तीन वर्षांनी थोडासा फरक केला. पण शोधू तर शकू ना एकमेकांना परत? पहिली ते तिसरी कुठे होत्या या भिंती.
हे गेट टूगेदर शाळेसाठी
नाही. हो पण हेही नक्की की या गेट टूगेदरनंतर आपण शाळेसाठी आणखी काही छान करू शकू.
समुहाची ताकद मोठी असते असं म्हणतात. मराठी शाळा बंद पडत आहेत ना, बघू या ना आपणही
प्रयत्न करून. झालोय की बऱ्यापैकी सेटल आपण सगळेच आयुष्यात. आणि अगदीच नसू तर
कदाचित एकमेकांनाही मदत होईल एकत्र बोलण्याने. भिंती पाडायला नऊही तुकड्यांमधले
काही जण एकत्र आलेत. इथे सगळेच हवेत. लवकर दूर होतील या DIVISIONS, those
things which divided us literally. तेव्हा कदाचित ही अक्कल नव्हती. ते शक्य
नव्हतं. पण आज कळतंय नि शक्य आहे. त्यामुळे तेव्हा का नाही केलंत, आत्ताच का, हे
असले प्रश्न नकोत. एक गेट टूगेदर करून पाहूया तर. नव्याने ओळखी होतील. सोशल
मीडियावरही करून घेतंच असतो की आपण ओळखी. कुठे रोज एकत्र आयुष्य जगायचंय. कदाचित
जुने मित्रमैत्रिणी नव्याने भेटतील, त्यांचा नवा पैलू कळेल. हे फक्त चार तास.
यात मला कोणताही आव
आणायचा नाही. दिखावा करायचा नाही. जे वाटलं ते त्या पद्धतीने प्रामाणिकपणे लिहित
गेलेय. त्यामुळे कदाचित जास्तही झालं असेल.. पण हे सारं नाकारण्यासाठी का होईना..
वाचा नक्की...
(ही पोस्ट माझ्या वॉलसह
शाळेच्या इतर दोन फेसबुक ग्रुपवरही आहे.)
Comments
Post a Comment