आऊटडेटेड बचपन..


आधीच सांगतेय ही शार्पनर्स माझ्यासाठी नाहीत. मी फक्त प्रयत्न करत होते जरासा आनंद शोधण्याचा.
काही दिवसांपूर्वी मी म्हटलंच होतं की माझ्या लहानपणी मला वेगवेगळ्या आकाराच्या शार्पनर्सनी खेळायला आवडायचं. बोरिवलीत मला तशी शार्पनर कुठेच मिळाली नव्हती.
म्हणून म्हटलं आज दुसऱ्या ठिकाणी शोधूया.
एके ठिकाणी जायचं होतं. त्या आधी हातात थोडा वेळ होता. पार्ल्यात होते. या पार्ल्यात माझं बालपण हुंदडलंय. त्यामुळे बदलाच्या खुणा शोधत शोधत फिरत होते.
हनुमान रोडवर मॅक्-डी सुरू झालंय की. बापरे! हे माहीतच नव्हतं. कित्ती काय काय बदलतं नि कित्ती काय काय तेच असतं.
याच हनुमान रोडवर एबीसी नावाचं स्टेशनरी शॉप आहे. या एबीसीमधून कित्ती पेनं (मराठीत पेनं च म्हणतात आमच्यात) विकत घेतलीयत. किती पॉइंट फाइव्ह पेन्सिल्स. प्लास्टिकचा राऊंडर.. असं तसं खूप काही..
त्या एबीसीमध्ये गेले.
अर्र.. त्या आधी अंधेरीला कमल स्टेशनरी स्टोअर म्हणून आहे. तिथेही गेले होते. अंधेरीला एका डॉक्टरांकडे काम होतं. या अंधेरीत आयुष्याची अडीच वर्षं काढलीयत. तर कमल स्टोअर्समध्ये जाऊन विचारलं वेगवेगळ्या शेप्सची शार्पनर आहेत का.. त्याने बिचाऱ्याने काढून दाखवली. म्हटलं अशी नाहीत, फ्रिज, भाज्या, पोस्ट बॉक्स वगैरे.. तो म्हणाला वो सब आऊटडेटेड हो गया..
मी डोक्यावर पडलेय अशा पुढच्या शंका येऊ नयेत म्हणून लगेच सांगितलं, की नही वो बच्चो को रिटर्न गिफ्ट देना था इस लिए..
तिथे नाही म्हटल्यावर पार्ल्यात जायचंच होतं तिथे आले.
एबीसीवाल्याने ही शार्पनर्स काढून दिली. किवी, टोमॅटो, कलिंगड. एक गाडीचं पण शार्पनर दिलं.
त्याला विचारलं अजून शेप्स नाही का येत. भाज्यांचे वगैरे. हा तर एकच शेप आहे.
उगाचच तो दुकानदार अजून काही शोधेल या आशेने त्याला म्हटलं किसी को दिखाना था.. मेरे बचपन में मिलता था वैसा शार्पनर. यादें शेअर करनी थी..
समज सकता हूं पर वैसा नहीं बनता अब...
मी चुपचाप ही शार्पनर्स विकत घेऊन निघाले.
पुढे आणखी दोन दुकानं होती. एक दुकान गायब होऊन त्या जागी प्रिंट आऊट, फोटोकॉपी वगैरे लिहिलेलं दुकान सुरू झालं होतं. त्या दुकानांमध्येही हेच जाऊन विचारलं.
बचपन के शहर में काश कोई बचपना मिल जाता!
मग ते सोपवलंही असतं कदाचित पुढच्या पिढीकडे. न गुंतता.
सगळीकडे एकच उत्तर मिळालं की, असं काही उपलब्ध नाही. आऊटडेटेड झालंय ते.
मग वाटलं तेच का, बचपन ही आऊटडेटेड हुआ है!
फुरसत कोणालाय एवढं चक्र फिरवून जगायची.
माझा जीव तशाच शार्पनरमध्ये का अडकलाय देव जाणे. कदाचित ते दिवस झटकता झटकता केसात अडकलेल्या पाण्याप्रमाणे हट्टीपणा करत असतील..
खरं तर हे आऊटडेटेड झालंय. मोठं झाल्यावर होतंच ते.
माझ्या आऊटडेटेड बचपन की ही मॉडिफाइड व्हर्जन्स. त्यांच्या कभिन्न होऊ शकणाऱ्या सावल्यांसह..
©मृण्मयी

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ