चल उडून जाऊ

 नितळ नदी पाहायला जाऊया... चल. हात पकडून उडून जाऊ. नदीमध्ये पाय नाही बुडवायचे. तिच्यामध्ये फक्त डोकावून पाहायचं. पायांना खरं तर खूप मोह होईल त्यात बुडायचा. पण त्यांना घट्ट बांधून टाकायचं जमिनीशी. पाण्याला नासवायचं नाही. त्याला बिघडवायचं नाही. फक्त नदीच्या आरपार दिसणारे दगड-गोटे पाहायचे. त्यांना म्हणायचं किती लकी आहात तुम्ही. नदीच्या कुशीत पहुडायला मिळतं.

तेवढ्यात नदीचं गाणं ऐकू येईल. ते ऐकायचं. किनाऱ्यावर त्या गाण्यावर नाचता आलं तर नाचायचंही. मंद-मंद. स्वतःत रमून जात. गाण्याचे शब्द नाही कळले तरी चालतील. काहीच फरक पडत नाही. गाणं एकदा भिनलं ना आपल्यात की शब्द मग वेगळे उरत नाहीत. ते त्यांचा अर्थ घेऊन प्रवाही होऊन जातात.
परवा मणिपुरी नृत्य पाहत होते. एक शब्दही कळला नाही. पण नाचावसं मात्र वाटलं. असं खूप खूप स्वतःत रमायचं असेल तेव्हा असं शांत शांत करणारं काही पाहायचं, काही करायचं.
नदी पण तशीच नाचते. हळुवार हातवारे करत. स्वतःभोवती गिरक्या घेत. हळुवार डुलत. ताल धरत.
चल, पटकन् मेघांच्या घरात जाऊन येऊ. मेघआंचं आलय. पक्ष्यांशी मैत्री होते का तिथे जाऊन पाहू. आपल्याही ओंजळीत इवलं पाखरू येऊन विश्वासाने बसतंय का पाहू. तेवढा मऊ नि ऊबदार असेल का आपला हात. ते नाहीच जमलं तर किमान वरून कोसळणाऱ्या धबधब्याचे थेंब तरी साठवू. ते तरी काही काळ चिकटून राहतील ना...
ते थेंबांचं रुजणं साठवून घेऊन मग कदाचित परतू आपल्या शहरात. त्या थेंबांना पुन्हा उकलून रुजत घालायला. इथे होईल का मग धबधबा निर्माण. पांढराशुभ्र. डोळ्यांच्या पापण्यांवर, केसांच्या बटांवर, नाकाच्या शेंड्यावर, मनाच्या कोपऱ्यात टिकून राहणारा.
हिरव्या-देखण्या पानांच्या कित्येक कमानी तुला हात हालवून बोलावतील. नक्की जवळ जा. कदाचित त्याची भुरळ पडेल. पानांच्या त्या कमानींमध्ये हरवून जाशील. पण तिथे सुखाने निजशील. चल जाऊ पानांच्या कमानींखालून संत्र-लिंबू पैशा-पैशाला खेळत. पण पानं खूप मजबूत असतात. कदाचित कोवळी पानं नाजूक असतात. खेचाखेच नकोच. फक्त त्या पानांखालून नाचत बागडत जायचं. या भूमीतलं इवलं गाणं तिथे रुजवून यायचं.
पण यायचंय का परत... उडून गेलं एकदा की परत सारखं सारखं नसतं यायचं त्याच जागी. त्या जागी असलेलं दाणापाणी संपलेलं असतं आपलं.
चल उडूनच जाऊ. ढगांच्या पल्याड. धबधब्याच्या मुखाशी. नदीच्या तळाशी. कातळाच्या पार. पानाच्या देठाशी. फांदीच्या टोकाशी. सगळे स्पर्श पंखांवर वागवत चल उडूनच जाऊ. 

-मृण्मयी

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ