मोठं होणं...

 तु्झ्या माझ्या गप्पांमधला चंद्र तेवढा उरलाय सोबत. तू न हरवूनही हरवलेला वाटतोस. हे सांगायचंय, ते सांगायचंय इथपासून प्रवास करत सांगायला काय नेमकं उरलंय असा प्रश्न पडतो. सभोवतालचं जग बदललंय, मी बदलले की तू बदललास.. 

ना. धों. महानोरांच्या कविता वाचत होते परवा-परवाच. मग वाटलं नदीकाठच्या तुझ्या आवडत्या ठिकाणी बसून त्या दोघांनी वाचायला हव्या होत्या. असं वाटतंय तोच राहू दे, एकट्यानेच वाचूया असं वाटलं. हातात तो क्षण येता येता निसटून गेला. मोठे झालो रे आपण. असं किती काळ मोठं होत राहायचंय. कविता वाचताना ती जगता न येऊन तसंच जगत राहायचंय. 

मन डोक्यात असतं की हृदयात. जरासं काढून पाहू का बाहेर? नेमकं काय झालंय त्याला. दहा वर्षं झाली की मैत्री तुटत नाही ना. तशी तुटणार नाहीच पण निसटलीय बहुधा ती हातातून. कुठल्या तरी दूरच्या किनाऱ्यावर दिसतोस पण तिथवर प्रवास करावासाच वाटत नाही. नदीच्या प्रवाहात वाहतोय तसे वाहत जाऊया असं वाटतं. कदाचित तुलाही तसंच वाटत असेल. आपण नेमकं काय करतोय- पैसे कमावतोय म्हणून कविता, गाणी, गप्पा असं सगळं विसरलोय का. मोठं तर तेव्हाही होतच होतो की. पण त्या मोठं होण्यात होतं की जपलेलं लहानपण आपण. 

तुला माहितीये, कॉफीच्या ग्लासवरचे आपल्या हातांचे ठसे पण पुसट झालेत. कधीतरी पूर्णच पुसून जातील. मग उरतील फक्त समोर दिसणारे दोन ग्लास. टिपिकल टपरीवरचे. आठवणी सांगणारे. किंवा तेही फुटून जातील. कायमचं काहीच उरत नसतं. वाटलेलं इतक्यांदा मैत्री तोडून-फोडून, चक्काचूर करूनही उरलीच आहे तर आहोत असेच उरू एकमेकांसाठी. पण ते वाटणंही हरवलंय. प्रवाहात वाहता वाहता कधी ओळखीचा चेहरा दिसतो, पण तो चेहरा आणि आठवणीतला चेहरा एकच आहे का हा विचार करण्यातच ओळखीचा चेहरा धूसर होतोय. आठवणीही होतील का धूसर... मोठं होणं असं असतं तर उगाच झालो मोठे. राहिलो असतो की तेवढेच. चव घेत घेत कविता जगलो असतो. कदाचित एक कविताच होऊन गेलो असतो. बिनचालीची. बिनकडव्यांची. बिनयमकाची. ओबडधोबड.   

©मृण्मयी

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ