माणसं

 माझे काही मित्रमैत्रिणी माणूस म्हणून अगदी हलकेच माणूसपण अधोरेखित करतात.

राजकीय मतभेद असले तरी माणूसपण जपतात. नि ते खूप छान वाटतं.


ते जगाच्या पाठीवर कुठेतरी असतात, मी काही कधी लिहित असते ते वाचतात. बातम्याही कधी कधी वाचतात. नि मदतीसाठी पुढेही येतात हे छान वाटतं.


दोन वर्षांपूर्वी करोनाच्या काळात बडोद्याहून महाराष्ट्रात चालत येणाऱ्या मुलांची बातमी केली. 

नंदुरबारहून योगिनी आणि लतिकाने पुढाकार घेत या मुलांना त्यांच्या गावापर्यंत सुरक्षित कसं पोहोचवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न केले. तेव्हा या दोघींची ओळख फेसबुकपुरतीच होती. 

योगिनीने लोकांना अपील केलं मदतीचं. आम्ही सरकारी पातळीवरही बोललो. फार कारभार हालताना दिसेना मग फेसबुकवरूनच अपील केलं. माझे मित्र-मैत्रिणी उभे राहिले. या मुलांच्या प्रवासासाठी सुमारे एक लाखांचा निधी पार्ले टिळकच्या मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून उभा राहिला. 

अभिमान वाटावा अशी बाब होती. एकरकमी ५० हजारांची मदत एका शाळेतल्याच मित्राने केली. पण त्याने नाव जाहीर करायचं नाही अशी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलीये. त्यामुळे ते नाही सांगणार. 


आत्ता नवरात्रीच्या काळात मुंबई टाइम्ससाठी आम्ही आधारस्तंभ अशी महिलांना मदत करणाऱ्या संस्थांची सीरिज केली. यात अॅसिड अटॅक झालेल्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचीही बातमी केली. 

मी अगदी वर्षभरापूर्वीपर्यंत व्हॉट्स अॅप स्टेटस नावाचा प्रकार अपडेट करत नव्हते. मी पाहत नाही स्टेटस त्यामुळे ते अपडेटही फारसं करत नव्हते. पण पुढच्या पिढीने तुला स्टेटस वापरता येत नाही, असं सुनावलं. मग जरा बातम्या, काही कोट्स बिट्स ठेवायला लागले.

माझा एक मित्र माझ्या स्टेटसवरच्या बातम्या हमखास पाहत होता असं लक्षात आलं. पण तो वाचत असेल असं वाटत नव्हतं. 

अॅसिड अटॅक व्हिक्टिमच्या बातमीत असं म्हटलं होतं की या महिलांना नोकरी मिळणं अडचणीचं जातं. 

त्याने त्या मुद्द्याच्या आधारे मला मेसेज केला आणि विचारलं मी यांना नोकरी देण्यासाठी काही करू शकतो का... उद्योजक म्हणून कार्यरत आहे तो सध्या. 

त्याला संस्थेचा संपर्क दिला पुढे बोल असं सांगितलं. 


अनेकदा आपण जे लिहितो ते अनेक जण वाचतात. रिअॅक्ट केलं नाही तरी त्याची नोंद होत असते आणि ते जास्त आवश्यक असतं, असं जाणवलं. 


जग रिअॅक्ट करतं. पण मित्रमैत्रिणींनी केलं की कधी कधी ते अधिक छान वाटतं. आणि ही रिअॅक्शन लाइक, छान लिहिलंयस याच्या पलीकडे जाणारी असते हेही महत्त्वाचं. 


मला माझ्या या मित्राचा खूप अभिमान वाटलाय. हाही माझा शाळेतलाच मित्र. दहावीपर्यंत प्रचंड भांडण केलेल्यांपैकी एक. 

माझे मित्रमैत्रिणी जगातलं काहीबाही मी लिहित असताना असे इतरांसाठी उभे राहतील अशी माझी कधी अपेक्षाही नव्हती. 

पण हे दोन्ही अनुभव मला माझ्या क्षेत्राबद्दल आणि माझ्या मित्रमैत्रिणींबद्दलही प्रचंड छान फीलिंग देणारे आहेत.

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ