प्रवास शिकवतो...

 

ग्रामीण भागातील समस्या जाणून घ्यायच्या तर काहीसा प्रत्यक्ष अनुभव घ्यावाच लागतो. 

सकाळी काही बातम्या फाइल करून संध्याकाळच्या बसने मध्य प्रदेशात जायला निघाले. मला बसचा प्रवास आवडत नाही. अजिबातच. पण पर्याय नव्हता. इंदूरवरून बडवानीला जायचं तर चार तासांचा प्रवास होता उलटा. त्यापेक्षा बडवानीजवळ उतरून मग पुढचा प्रवास करणं सोपं होतं. 

त्या आठवड्यात भरपूर पाऊस होता. माझ्या पिक अप पॉइंटपर्यंत पोहोचेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू झाला. नशिबाने पिक अप पॉइंट हा बरं हॉटेल होतं. त्यामुळे किमान सुरक्षित उभं राहणं शक्य होतं. १५-२० मिनिटं पावसात काढल्यानंतर एकदाची बस आली. बसमध्ये बसून मग चिमुकली बातमी फाइल केली. त्यात मला मिळालेली जागा ही चाकावरची होती त्यामुळे दणादण उडत होती बस. म्हटलं सगळं अनुभवलं पाहिजे. सारं कसं सोपं नि आपल्याला सोईस्कर मिळावं... 

बसमध्ये चढताना लॅपटॉपची बॅग, कपड्यांची लहान बॅग आणि पर्स सांभाळताना पर्सचा गळ्यात स्लिंगप्रमाणे अडकवण्याचा पट्टा कशात तरी अडकून तुटला. माझी ही पर्स एका खांद्यावरही घेण्याच्या लायकीची होती त्यामुळे पुढचे मध्य प्रदेशातील दिवस निभावले. बाहेरच्या प्रवासात मी पर्समध्ये हेड लँम्प, वेट टिश्युपासून सगळं कोंबते. सुदैवाने यावेळी बसने घेतलेला ब्रेक बऱ्या आणि स्वच्छ वॉशरुमच्या जवळचा होता. त्यामुळे त्रास नाही झाला. पण गेल्या वर्षी नंदुरबारला जाताना, त्या आधी कधीतरी भिलारला पुस्तकांच्या गावाची बातमी करायला जाताना बस जिथे थांबली ते प्रकरण भयंकरच होतं. एकट्याने बसने प्रवास करताना मुख्य अडचण वॉशरुम वापरण्याची असते. त्यामुळे पर्स स्लिंग बॅगेसारखी क्रॉस घेणं हे प्रिफरेबल असतं. 

त्यातून अनेकदा वॉशरुमला आतून कडी नसणं, पर्स अडकवायला हुक्स नसणं अशाही अडचणी असतात. 

मग स्वतःला सांगायचं आपण एकच तर दिवस प्रवास करणारोत. रोज कुठे अशा अडचणींना सामोरं जावं लागतंय. 

प्रवासासंदर्भात एसएमएस आला तेव्हा त्यात आपली चादर बिदर घेऊन या असं नमूद होतं. मी लॅपटॉपच्या बॅगेत लहानसं पांघरुण कोंबलं. बॅग स्वाभाविकच जड झाली. बॅग जड कशी होते याचा मला अदरवाइजही पत्ता लागत नाही. पण ती होते. 

आमची बस टोल वाचवत वाचवत रुट बदलत चालत होती. ठरल्यापेक्षा दोन ते अडीच तास उशीरा पोहोचली. 

मी जुलवानियाला उतरणार होते. तिथे गाडी येणार होती. पण अडीच तास उशीरा पोहोचत असल्याने त्यांना थांबू नका सांगितलं. 

जुलवानियाला उतरायच्या आधी बसने पुन्हा एक ब्रेक घेतला. ब्रेकफास्टसाठी. अर्धा-पाऊण तास सहज तिथे थांबणार होती. बस ड्रायव्हरला विचारलं इथून जुलवानियाचा स्टॉप किती लांब तर म्हणाला दोन मिनिटं. म्हटलं ठीक आहे. दोन मिनिटं तर काय आपण सामान घेऊन चालू शकतो.

अस्मादिकांनी चालायला सुरुवात केली. पाठीवर बॅग, पर्स आणि हातात ट्रॉली बॅग.

दोन मिनिटं बसचा प्रवास किमान १५ मिनिटांचा पायी झाला. हायवेवरून जात असताना मागून पुढे निघून जाणाऱ्या गाड्यांच्या माना वळून पाहत होत्या. म्हटलं आपण पाहायचं नाही त्यांच्याकडे. 

त्यांना पाहू दे.

मला रस्त्यात गाडी बंद पडली म्हणून सामान घेऊन चालणाऱ्या सिनेमातल्या टिपिकल बायकांची आठवण येत होती. फरक एवढाच होता की मी हिल्स बिल्स वापरत नाही त्यामुळे तोंडघशी पडायची भीती नसते. 

कानात हेडफोन अडकवले आणि समोर गुगल मॅप लावला नि चालत होते. ठिकाण पाच किंवा दहा मिनिटांनी येणार तर होतंच. फक्त त्यामध्ये बसवाल्याला शिव्या घातल्या. 

त्यात एका बाइकवाल्याने कुठे जाताय असं विचारलं. त्याने बिचाऱ्याने चांगल्या हेतूने विचारलंही असेल पण गाडी आ जाएगी म्हणत त्याला नको बाबा तुझी मदत असं सांगितलं. खांदे उडवत तो निघून गेला. 

सी टू सँड एक्सपीडिशनला बाडमेर जिल्ह्यात मला बसमधून फिरायचं होतं. त्याशिवाय स्थानिक गोष्टी कळत नाहीत. मला भावाने अजिबात बसने जायचं नाही असं सांगितलेलं. चालता चालता मला त्याचीच प्रकर्षाने आठवण आली. 

जुलवानियाला पोहोचल्यावर खासगी बसने पुढचा प्रवास करायचा होता. साधारण अर्धा तास थांबल्यानंतर बऱ्यापैकी भरलेली बस आली आणि मी चढले. एका बाईंनी माझं सामान बघून बसा तुम्ही मी उतरतेच आहे म्हणून जागा करून दिली. 

मला आधीच सांगण्यात आलं होतं की बसमध्ये दोन तिकिटं घे, म्हणजे सामान बाजूच्या सीटवर ठेवता येईल. मिनी बस होती ती. माझ्या बाजूला माझी अख्खी बॅग बसली आणि मग जागाच उरली नाही. कंडक्टरनेही मला दोन तिकिटं दिली म्हणजे दोन तिकिटांचे पैसे घेतले आणि सामान सीटवर राहू दे असं म्हटलं. एक जागा उगाचच अडली होती. पण सुदैवाने पुढच्याच स्टॉपला बऱ्यापैकी लोक खाली उतरले आणि मग मला ती जागा अडवल्याच्या गिल्टवर मात करता आली. 

बसमध्ये असताना कुठे पोहोचल्याचे फोन जेव्हा येत होते तेव्हा मराठीतच बोलणं होत होतं. आणि मग मी आजूबाजूच्यांना विचारत होते ये क्या है, बस कहां पहुची है... शहरातनं आलेलं अडाणी पात्रही वाटलं असेन मी त्यांना. पण त्यांनी मदत केली. 

कहां जाना है... बडवाणी में नर्मदा आंदोलन के ऑफिस में. 

तो लास्ट स्टॉपही उतरना, एका घुंघट घेतलेल्या बाईंनी मला त्या उतरत असताना सांगितलं. 

त्यांना खरंच माहीत होतं का, मला अंदाज नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असं ठरवलं. 

बस स्टँडवर मला गाडी घ्यायला येणार होती. बस रिकामी होत होती. सगळे उतरत असल्याचं पाहून आपण योग्य ठिकाणी उतरू ना, स्टॉप निघून तर गेला नाही अशा अनेक शंका येत होत्या. 

मग स्वतःला सांगितलं की गेला तर जाऊ दे. बघू काय करायचं ते.

सामान नसतं तर अर्थातच मी हे सगळं कदाचित जास्त एन्जॉय केलं असतं. पण जेवढा प्रवास करायला मिळाला तोही मेंदूला जागं करणारा होता. 

माझ्या प्रवासाचं तिकिट प्रती माणूस साधारण साठ किंवा सत्तर रुपये होतं. इतरांचा प्रवास आधी संपणारा होता. हे तिकीट न परवडणारेही त्यात होते. पैसे कमी होतील का अशी विनंती, मग कंडक्टरचं नाही होणार म्हणणं...

आणि मग सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, त्या सोयींबद्दलचे प्रश्न...

विद्यार्थ्यांनी शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी तासन् तास प्रतीक्षा करायची. किंवा चालत निघायचं. नाही तर मग शाळा जवळ नाही, महाविद्यालय जवळ नाही म्हणून शिक्षण सोडायचं. 

तिकिटासाठी रोजचे २५-३० रुपये कुठून आणायचे त्यांनी?


मुंबईला निघायच्या दिवशी रात्री १२ वाजता बस जुलवानियाला पोहोचणार होती. तिथे रात्री १२ पर्यंत एकटं कसं थांबायचं हा प्रश्न होताच. मग मला त्याच्या दोन तास आधीच्या स्टॉपला पोहोचता येईल असं सांगितलं. जुलवानियाला जायलाही बडवानीवरून दीड तास लागणार होता. त्याऐवजी मध्ये जाता जाता एक वस्ती पाहून आधीच्या स्टॉपला पोहोचता येईल असं मला सांगितलं. त्यानुसार ठिकरीला बस पकडण्यासाठी पोहोचले. सोबत आलेली गाडी निघून गेली. ठिकरीला एका कार्यकर्त्यांकडे थांबले. ठिकरी इंदूरपासून तुलनेने जवळ असल्याने कदाचित रिक्षा किंवा तत्सम काही वाहन नंतर मला हायवेवर बस पकडायला जायला मिळू शकेल असं वाटलं. मी उगाचच चाळा म्हणून उबर, ओला असं चेक करत बसले. तर दोन्ही अॅप्स माझ्यावर खदाखदा हसली. 

इथे बाकी सोय नाही. मला स्थानिकांनी सांगितलं. 

आपल्यामुळे कुणाला तरी जागं राहायला लागतंय, रात्री बस उशीरा आली तर त्यांना उशीरा सोडायला यायला लागणार हे जामच वाईट असतं. 

ते म्हणाले की पाच मिनिटांवर हायवे आहे. काळजी करू नका. इथे दुसरा पर्यायच नाही, त्यामुळे मुलं मोठी झाली की लगेच बाइक येतेच घरात दुसरी. 

ठिकरीला जाता जाता मला स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की मुलीही आजकाल बऱ्यापैकी टू व्हिलर चालवायला लागल्या आहेत. त्यामुळे शिक्षण, नोकरी यांची संधी मिळतेय. त्या घेतायत ती संधी. 


पण अर्थातच प्रश्न होता की, ज्यांना हे परवडत नाही, त्यांचं काय...


घरातून खाली उतरल्यावर रिक्षा, बस, टॅक्सी काही ना काही हक्काचं वाहन रात्री १२ नि १ वाजताही मिळू शकणाऱ्या शहरातलं जगणं हे खरंच किती सोपं असतं, असं मेंदूत दहा-पंधरा वेळा अंडरलाइन झालं. 

 

चौकटीबाहेर पडून जगायचं असतं ते यासाठी. 

सतत हे नाही, ते नाही अशी किरकिर करण्यापेक्षा किती काय आहे, किती काय देऊ शकतो हे जाणवलं पाहिजे जगताना असं वाटत राहतं. 

प्रवास शिकवत राहतो हे सारं. 

पायावर असलेली चाकं गर्र फिरत राहतात.


(प्रवासात फोटो काढायला विसरलेय. त्यामुळे बातम्यांसाठीचेच फोटो जगण्याची कल्पना येण्यासाठी)

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ